अमरावती : संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माेहन खेडकर यांचे बँक खाते आयकर विभागाने कनेक्ट केले आहे. ६० लाखांचा आयकर घोळ निस्तारण्यासाठी ही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती आहे.
डाॅ. मोहन खेडकर यांनी कुलगुरू बंगल्यावरील कर्मचारी आणि सोई-सुविधांची माहिती दडवून ठेवल्याबाबत आयकर विभागाने नोटीस बजावली होती. २३ फेब्रुवारी २०११ ते २४ फेब्रुवारी २०१६ या दरम्यान मोहन खेडकर हे विद्यापीठाचे कुलगुरू होते. खेडकर यांनी आयकर विभागाला दिलेल्या विवरणपत्रात वीज, पाणी, फर्निचर, नोकरचाकर आदी सुविधांवरील खर्चाची माहिती दडविली होती.
वीज, पाणी, फर्निचर, बंगल्यावरील कामगार, घरकामगार, सुरक्षा रक्षक कायमस्वरूपी कर्मचारी आणि वॉचमन यांच्यावर पाच वर्षात १ कोटी ३९ लाखांचा खर्च होत होता. असे असताना डॉ. मोहन खेडकर यांनी आयकर विभागापासून माहिती दडवून ठेवली, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या खर्चाच्या अनुषंगाने मासिक वेतनात खर्च नमूद होणे नियमानुसार अनिवार्य आहे; मात्र खेडकर यांनी ती दडवून ठेवली. सुसज्ज बंगल्यावरील सोई -सुविधा घेतल्या; पण आयकरच्या नोंदी त्या नाहीत.
आयकर विभागाकडे फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये कर्मचारी वेतन, बंगल्यावर फर्निचरसह अन्य सुविधांवर झालेला खर्च नमूद करण्यात आला नव्हता. मोहन खेडकर यांच्या कार्यकाळात सोई-सुविधांवर झालेला खर्च १ कोटी ३९ लाख रुपये आहे, त्यामुळे आयकर चोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता खेडकर यांच्याकडून मूळ आयकर चोरीचे ४२ लाख आणि १९ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्याकरिता आयकर विभागाने मोहन खेडकर यांचे बँक खाते संलग्न केले आहे. याबाबत अमरावती येथील आयकर विभागाच्या सहआयुक्तांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.