किशोर मोकलकर
आसेगाव पूर्णा (अमरावती) : ७० वर्षे वयाच्या टाकरखेडा पूर्णा येथील शेतकऱ्याला बँकेनेपीक कर्ज नाकारले. वय झाल्याने त्यांना पीक कर्ज नाकारण्यात आले. तथापि, आता शेती कशाच्या भरवशावर करायची, या वयात सावकाराच्या दारात जायचे का, अशी व्यथा या वृद्ध शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथील शेतकरी शंकरराव शेषराव वसू यांचा सातबारा कोरा आहे. विशेष म्हणजे शंकरराव वसू या शेतकऱ्याने गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून पीक कर्ज घेणे व कर्जफेड करणे असा त्यांचा व्यवहार नियमित होता. बँकेने गतवर्षीचे कर्ज त्यांच्याकडून भरून घेतले व नंतर वयाची अट असल्याचे कारण देत कर्ज नाकारले. होते-नव्हते तेवढे पैसे बँकेत भरून झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यासाठी त्यांनी दोन महिन्यांपासून बँकेचे उंबरठे झिजवले. मात्र, बँक प्रशासन नियमावर बोट ठेवून त्यांना परतवत आहे. आता शेती कशी उभी करायची, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. पीक कर्जासाठी अडसर ठरलेला हा नियम शिथिल करावा, अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली.
मी बँकेचा नियमित खातेदार आहे. दरवर्षी पीक कर्ज घेतो व वेळेतच भरणा करतो. परंतु, यावर्षी बँकेने वयाचे कारण देत कर्ज नाकारले. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.
- शंकरराव शेषरावजी वसू, शेतकरी, टाकरखेडा पूर्णा
७० वर्षांवरील लोकांचे इन्शुरन्स कव्हर होत नसल्यामुळे बँक कर्ज देत नाही. मात्र, त्या व्यक्तीने गॅरेंटर देऊन दुसऱ्या नावाने, मुलगा किंवा मुलगी यांच्या नावाने केस केल्यास बँक कर्ज देऊ शकते.
- प्राची वासनिक, बँक व्यवस्थापक, इंडियन बँक, आसेगाव पूर्णा