वाहतूक कोंडी नित्याचीच : पोलीस प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष
चांदूरबाजार : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने विविध शासकीय कार्यालयांसह रुग्णालय व बँकांसमोर पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांसमोर वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कठीण होत असलेल्या पार्किंगच्या समस्येवर पालिका व पोलीस प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.
शहरातील जुनी पंचायत समिती, बस स्थानक परिसर, नगरपरिषद, स्टेट बँकसह मुख्य मार्गावरील राष्ट्रीयीकृत बँकेसमोरील पार्किंगचा प्रश्न काही दिवसांपासून चव्हाट्यावर आला आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून वाहनधारकांना शिस्त लावण्यासह पार्किंगची व्यवस्था करायला लावणे गरजेचे आहे. शहरात पार्किंगची समस्या सर्वात जास्त विविध बँका व रुग्णालयांसमोर असलयाचे निदर्शनास येत आहे. शहरातील स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियासारख्या राष्ट्रीयीकृत बँकांसमोर वाहनांची रीघ लागलेली दिसून येते. बँकेत व्यवहाराकरिता येणारी वाहने पार्किंग व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे अनेकदा वाहनधारकांचे परिसरातील दुकानदारांशी वाद-विवाद होताना दिसून येतात. बँकेत कामानिमित्त येणाऱ्या वृद्ध अपंग यासह सामान्य नागरिकांनादेखील हा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची सोय नसल्याने जागा दिसेल तेथे वाहने लावली जातात. असे चित्र शहरातील विविध ठिकाणी दृष्टीस पडत आहे.
रस्ते बनले पार्किंग प्लेस
राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. परिणामी अनेकदा रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते. याकडे वाहतूक पोलीस या सर्व प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. शहरातील वाहतूक पोलिसांची ड्युटी शहरातील मुख्य चौकात कधीच नसून परतवाडा मार्गावरील टी-पॉइंट व अमरावती मार्गावर शहरापासून २ किलोमीटर अंतरावर लागलेली असते काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.
पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही केव्हा?
शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर पार्किंग व्यवस्था नसताना रस्त्यावर वाहने उभी करण्यास भाग पडणाऱ्या या बँकांवर दंडात्मक कारवाईची मागणी शहरातील नागरिकांतर्फे केली जात आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाने अशी दंडात्मक कारवाई केल्यास शहरातील रस्ते मोकळा स्वास घेऊ शकणार असल्याची प्रतिक्रिया शहरातील नागरिकांतर्फे व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील अतिक्रमण निर्मूलनाप्रमाणेच बँकेसमोरील पार्किंग समस्येवर तोडगा काढून हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्याची गरज झाली आहे.
----------------