अमरावती : सायबर गुन्हेगारांनी दिल्लीत बसून स्टेट बँकेच्या अमरावती येथील खात्यांचे बँक स्टेटमेंट मिळवून खातेदारांचे पैसे परस्पर काढले. गुडगावातील ज्या एसबीआयच्या एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी रक्कम काढली, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांच्या एसबीआय बँक खात्यातून तब्बल १४ लाखांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती चोरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे एटीएम क्लोन करून हरियाणा राज्यातील गुडगावातून पैसे काढण्यात आल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. त्या अनुषंगाने अमरावतीचे सायबर सेलचे पोलीस गुडगावात पोहोचले. स्टेट बँकेच्या ज्या एटीएममधून सायबर गुन्हेगार पैसे काढत आहेत, त्या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजची पोलीस तपासणी करीत असून, ज्या वेळी रक्कम विड्रॉल झाली, त्या वेळेला एटीएममध्ये कोण होते, याची पडताळणी होत आहे.
गुडगावातील सीसीटीव्ही फुटेज सायबर टीमने ताब्यात घेतले आहे. दिल्लीत बसून गुन्हेगारांनी अमरावतीमधील खातेदारांच्या खात्यात किती रोख आहे, हे पडताळून रोख काढल्याचे निदर्शनास आले आहे. दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.