अमरावती : यंदाच्या हंगामात सुरुवातीला पाऊस माघारल्याने खरिपाची दुबार पेरणी करावी लागली. शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपात बँकांचे सहकार्य राहिले. पश्चिम विदर्भात ८५३९.३२ कोटी पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना पाच महिन्यांत बँकांनी ३,३०,८३४ शेतकऱ्यांना २५३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले, याची २९ टक्केवारी आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटपात माघारल्याचे वास्तव आहे.
सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. यावर शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली असली तरी अटी-शर्तींमध्ये लाखो शेतकºयांचा सात-बारा कोरा झालाच नाही. सलग चार वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना बँका पीककर्ज नाकारत आहेत. प्रशासनाच्या तंबीला बँका जुमानत नसल्याने या बँकांवर अंकुश कुणाचा, हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यंदाच्या हंगामासाठी अमरावती जिल्ह्यात १६८५ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४३,५२३ शेतकºयांना ३६,००२ हेक्टर क्षेत्रासाठी ४७४.३६ कोटींचे कर्जवाटप केले. ही २८ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात १३९८.७८ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत ४६,६८४ शेतकऱ्यांना ४८,५१६ हेक्टरसाठी ३९९.२१ कोटींचे कर्जवाटप केले. ही २८.५४ टक्केवारी आहे. वाशीम जिल्ह्यात १५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४०,८९४ शेतकरी खातेदारांना ४४,९२५ हेक्टरसाठी ३३१.८७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही २१.६९ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात १७७३ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २९,४१३ शेतकºयांना ८०७८ हेक्टर क्षेत्रासाठी २३३.६० कोटींचे पीककर्जवाटप करण्यात आले. ही १३.१७ टक्केवारी आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात २१६१ कोटींच्या पीकर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,७०,२६० शेतकºयांना १,०६,४१२ हेक्टर क्षेत्रासाठी १०९३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ५०.५६ टक्केवारी आहे.
राट्रीयकृत बँका प्रशासनाला जुमानेनायंदाच्या हंगामासाठी विभागातील राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११.०३ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहे. आता खरीप हंगामाचे वाटप संपत आले असताना या बँकांनी १,५२,३८८ शेतकऱ्यांना १३८०.९४ कोटींचे वाटप केले ही २५.५२ टक्केवारी आहे. यातुलनेत जिल्हा सहकारी बँकांना २३०५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,६४,३२९ शेतकरी खातेदारांना १०२५.९१ कोटींचे वाटप केले. ही ४४.४९ टक्केवारी आहे, तर ग्रामीण बँकांना ८३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १४,११७ शेतकऱ्यांना १२५.२९ कोटींचे कर्जवाटप केले. ही १५.०५ टक्केवारी आहे.