अमरावती: पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने बालाजी प्लॉट येथून ३२ हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित फटाके जप्त केले. ३ ऑक्टोबर रोजी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे यांना जी माहिती मिळाली, ती राजापेठच्या ठाणेदारांसह डीबी पथकाला का मिळाली नाही, असा सवालच खाकीतून उपस्थित होत आहे.
दरम्यान, इंगळे यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने बालाजी प्लॉट येथील घनश्याम सारडा (४६) याच्या दुकानाची झाडाझडती घेतली असता, त्याने दुकानामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या फटाक्यांचा अंदाजे ३२ हजार १९ रुपयांचा माल विक्रीकरिता बाळगला असल्याचे दिसून आले. त्याला मुद्देमालासह पुढील कार्यवाहीकरिता राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस शिपाई रणजित गावंडे, रोशन वऱ्हाडे, सुरेश चव्हाण, राजीक रायलीवाले, निखिल गेडाम यांनी ही कारवाई केली.