लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आगमन झालेल्या गणेशाला आता अखेरचा निरोप देण्याची वेळ आली आहे. शहर तथा ग्रामीण क्षेत्रातील तीन हजारांवर गणेश मंडळांकडून गुरुवारपासून गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. गणेश आगमनाच्या वेळी असलेला उत्साह पुन्हा विसर्जनप्रसंगी शिगेला पोहोचणार आहे. जिल्हावासी गणेशाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. पोलिसांच्या तगड्या पहाऱ्यात गुरुवारपासून गणेश विसर्जनाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा गणेशभक्तांच्या प्रत्येक हालचालीवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.जिल्हाभरात गणेशोत्सवाची धूम दहा दिवस पाहायला मिळाली. गणेशभक्तांनी दहा दिवस आराधना करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. घरगुती व सार्वजनिक गणेश स्थापनेत यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी जिल्हावासीयांनी पुढाकार घेतला होता. आता गणेश विसर्जनाची वेळ येऊन ठेपली असून, लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जिल्हा प्रशासनासह भाविक मंडळी तयारीत आहेत. गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक तलावांवर प्रशासनाकडून विशेष सोय करण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय कृत्रिम तलावातही गणेशमूर्ती विसर्जित करण्याची सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत २२७८, तर शहरात ४७५ सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जित होणार आहेत.भव्यदिव्य मिरवणूक, ढोल-ताशांच्या गजरात गणेशाला निरोप दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस विभाग कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी खडा पहारा देणार आहे. शहर व ग्रामीण पोलिसांसह एसआरपीएफचे जवान व होमगार्ड तसेच ३ हजार ५०० पोलिसांचा बंदोबस्तात राहणार आहे.१७ सप्टेंबरपर्यंत विसर्जनपोलीस आयुक्तालय हद्दीतील ४७५ सार्वजनिक गणेश मंडळांतील गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू राहणार आहे. ११ सप्टेंबर रोजी शहरातील चार मोठे गणेश मंडळे मूर्ती विसर्जन करणार असून, १२ सप्टेंबर रोजी १४९, १३ सप्टेंबर रोजी १४६, १४ सप्टेंबर रोजी १०८, १५ सप्टेंबर रोजी ६१, १६ सप्टेंबर रोजी चार व १७ सप्टेंबर रोजी एका मंडळाकडून गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. यामध्ये राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६८, कोतवाली हद्दीतील ३२, खोलापुरी गेटचे ३७, भातकुलीचे १८, गाडगेनगरचे ८०, नागपुरी गेटचे १७, वलगावचे ४४, फ्रेजरपुऱ्याचे ६६, बडनेराचे ६६, नांदगाव पेठ हद्दीतील ४७ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.असा राहील शहरात पोलीस बंदोबस्तशहरातील विविध परिसरातून गणेश विसर्जन स्थळापर्यंत शोभायात्रा निघणार आहेत. अशाप्रसंगी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वात तीन्ही पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, १०४ पोलीस उपनिरीक्षक, १ हजार १०० पोलीस कर्मचारी, १ एसआरपीएफ प्लॉटून, रेल्वे विभागाच्या चार अधिकाऱ्यांची चार पथके असा तडगा बंदोबस्त चौका-चौकात व शहरातील विविध परिसरात तैनात राहणार आहे. याशिवाय पोलीस व्हिडीओ कॅमेरे घेऊन गणेशभक्तांच्या हालचालीवर लक्ष ठेवून राहणार आहे.गुंड प्रवृत्तीवर विशेष लक्षशहर पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पर्वावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे १५०० गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांनी ६७ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी गोंधळ किंवा अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलीस यंत्रणा गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून आहे. याशिवाय रेकॉर्डवरील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांना पोलीस डिटेनसुद्धा करणार आहे.
पोलिसांच्या पहाऱ्यात आजपासून बाप्पाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:00 AM
जिल्हाभरात गणेशोत्सवाची धूम दहा दिवस पाहायला मिळाली. गणेशभक्तांनी दहा दिवस आराधना करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. घरगुती व सार्वजनिक गणेश स्थापनेत यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी जिल्हावासीयांनी पुढाकार घेतला होता.
ठळक मुद्दे३,५०० पोलीस बंदोबस्तात : शहर, ग्रामीण क्षेत्रात तीन हजार गणेशमूर्तींचे विसर्जन