प्रभाकरराव भगोले।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील बासलापूर जवळ कोणीही गेले, तर त्यांना दुचाकीवर येऊन तहान भागविणारा ‘मोबाइल वॉटरमॅन’ नक्की दिसेल. उन्हातान्हात तहानलेल्या प्रत्येक वाटसरूला हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो. गेल्या २० वर्षांपासून हे काम तो अखंड करीत आहे. त्याच्या या कार्याची इंडिया बूक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यावर्षीच्या नोंदीसाठी तो महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती असल्याचे समजते. विवेक ऊर्फ राजू वासुदेवराव चर्जन (रा. बासलापूर, ता. चांदूर रेल्वे) हे ते वॉटरमॅन असून, अल्पभूधारक शेतकरी आहेत. दररोज सकाळी शेतीची सगळी कामे आटोपून दुपारी घर गाठायचे, अंघोळ करून आणि दोन घास पोटात टाकून बाहेर पडायचे ते तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी, हा विवेक चर्जन यांचा गेल्या २० वर्षांपासूनचा नित्यक्रम आहे. त्यांच्याकडील चार पिशव्या आणि २० बाटल्यांमध्ये ते पाणी भरतात आणि त्या दुचाकीला बांधून बाहेर पडतात. जवळपास किमान ३० किलोमीटर ते दररोज नक्कीच फिरतात. अमरावतीच्या दिशेने त्यांच्या प्रवासादरम्यान रस्त्यात नजरेस पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने ते एक ग्लास पाणी पाजतात. त्यांच्या या कामामुळे विवेक चर्चन या भागात 'मोबाइल वॉटरमॅन' म्हणून ओळखले जातात. कोणत्याही ऋतूची पर्वा न करता तापत्या उन्हात पाणी वाटपाचे काम ते करतात. झाडाखाली जरा वेळ थांबलेल्या मजुरांना ते आवर्जून ग्लासभर पाणी देतात. विशेष म्हणजे, यासाठी ते कुठलेच पैसे घेत नाही. महागाईच्या काळात त्यांच्या दुचाकीच्या पेट्रोलचे पैसेदेखील आपल्याच खिशातून देतात. कुणाकडूनही ते पैसै स्वीकारत नाहीत. तहानेने व्याकूळ झालेल्या एखाद्या व्यक्तीला पाणी हे सलाइनसारखे कार्य करते आणि मलाही डॉक्टर झाल्यासाखे वाटते, असे विवेक चर्जन सांगतात. ते पक्ष्यांसाठीसुद्धा जलदूत ठरले आहेत.अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर दर किलोमीटर अंतरावर पक्ष्यांसाठी झाडावर त्यांनी पाण्याची सोय केली आहे. फांदीला ही जलपात्रे बांधून ठेवली आहेत. त्यामध्ये पाणी टाकायला ते कधीच विसरत नाहीत. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकतीच इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. इंडिया बूक आॅफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र, शिल्ड व पुस्तक विवेक चर्जन यांना प्राप्त झाले आहे. या रेकॉर्डसाठी यावर्षी ते महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती असल्याची माहिती आहे.
बासलापूरचा ‘मोबाइल वॉटरमॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:33 AM
तालुक्यातील बासलापूर जवळ कोणीही गेले, तर त्यांना दुचाकीवर येऊन तहान भागविणारा ‘मोबाइल वॉटरमॅन’ नक्की दिसेल. उन्हातान्हात तहानलेल्या प्रत्येक वाटसरूला हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो.
ठळक मुद्देइंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद : महाराष्ट्रातून एकमेव, २० वर्षांपासून तहानलेल्यांची भागवितात तृष्णा