राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : पंचायत समिती मूल येथील गटविकास अधिकारी प्रदीप रंगराव पांढरबळे यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेली सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. भविष्यातील ध्येय व मनातील आत्मविश्वास या बळावर आपण सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी पात्र ठरल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रदीप पांढरेबळे हे मुळचे सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे या लहानशा गावातील रहिवाशी आहेत. प्राथमिक शिक्षणापासून अभ्यासाविषयी तळमळ व काही तरी वेगळे करुन दाखविण्याची तत्परता त्यांच्यात होती. त्यांचे इयत्ता पहिली ते दहवी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर अकरावी ते बारावीपर्यंत इस्लामपूर व त्यानंतर सांगली येथील इंजिनिअरीग कॉलेज मध्ये मेकॅनिकल मध्ये डिग्री प्राप्त केली. इंजिनिअरींग करताना दुसऱ्या वर्षी स्पर्धा परीक्षेविषयी चर्चा करुन अभ्यासाकडे वळले. इंजिनिअरींग शाखेतच स्पर्धा परीक्षेबाबत मनमोकळी चर्चा करण्यात त्यांचे मित्र सचिन मोरे, रोहन शिंदे, शिवाजी माकडे यांनी साथ दिली. गावातील एका देवळात अभ्यासाला सुरुवात केली. या काळात वाशिम येथील उपपोलीस अधीक्षक विशाल खांबे यांचे मार्गदर्शन लाभले.ते दुसºया प्रयत्नात सन २०१३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन गटविकास अधिकारी पदासाठी पात्र ठरले. गटविकास अधिकारी पदाची नियुक्ती पंचायत समिती मूल येथे झाल्याने प्रशासनातील बारकावे बघता आले. खूप काही शिकता आले, असे त्यांनी सांगितले. यातून वेगळे काही करता यावे, यासाठी उपजिल्हाधिकारी व सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा अयोगाअंतर्गत परीक्षा दिली व पात्र ठरल्याचे ते सांगतात.सांगली जिल्ह्यातील असलो तरी माणूसकीची नाळ जुळली असल्याने ज्या तालुक्यात आपण पदावर कार्यरत आहोत, त्या तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले पाहिजे. यासाठी आपण स्पर्धा परीक्षेविषयी अनेकदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. स्वत: ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके मिळावीत, यासाठी पुस्तके उपलब्ध करुन दिली. आजही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आपला पुढाकार असते, असे ते म्हणाले.अवघ्या २७ व्या वर्षी गटविकास अधिकारी पदावर मूल पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यावर कधीही अधिकारी पदाचा आव आणला नाही. हसत मुखाने आलेल्या समस्येवर तोडगा काढण्यात त्यांचा हातखंड असल्याने अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना आपलेसे वाटायला लागले. सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर निवड झाल्याने ते महिनाभरात कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी पदभार सांभाळतील. मात्र पहिलीच गटविकास अधिकारी पदाची नियुक्ती मूल पंचायत समितीत झाल्यानंतर जे शिकायला मिळाले, ते कदापी विसरता येणार नसल्याचे ते सांगतात.जीवनात नवीन काहीतरी करुन दाखविण्यासाठी नवा जोश, नव्या उत्साहाबरोबरच आत्मविश्वास देखील महत्त्वाचा आहे, असे सांगताना त्यांनी अभ्यासात सातत्य असणे तेवढेच गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात युपीएससी परीक्षा देऊन आयएसआय अधिकारी बनायचे स्वप्न आहे. मात्र अधिकारी बनलो तर मूल तालुक्याशी जुळलेली नाळ कदापी विसरणार नसल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.
मूलचे बीडीओ बनले सहायक विक्रीकर आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:12 PM
पंचायत समिती मूल येथील गटविकास अधिकारी प्रदीप रंगराव पांढरबळे यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेली सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण केली.
ठळक मुद्दे‘लोकमत’शी वार्तालाप : लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण