बॅटरी कारचा फोटो घेणे
रेल्वे स्थानकावर लवकरच सुविधा, एजन्सीद्वारे सेवा पुरविणार
अमरावती : रेल्वे स्थानकावर ये-जा करताना वृद्ध, दिव्यांगांना सोयीचे व्हावे, यासाठी अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर बॅटरी ऑपरेटेड कार उपलब्ध होणार आहे. रेल्वे पादचारी पूल, रॅम्पवर वृद्ध, दिव्यांगांची अडचण लक्षात घेऊन भुसावळ मध्य रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. एजन्सीमार्फत ही सुविधा पुरविली जाणार आहे.
मुंबई, नागपूर, पुणे येथील रेल्वे स्थानकावर ये-जा करण्यासाठी वृद्ध, दिव्यांगासाठी असलेली बॅटरी कार आता अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर लवकरच उपलब्ध होणार आहे. त्याकरिता भुसावळ मध्य रेल्वे विभागाने निविदा काढल्या आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात अमरावती, बडनेरा, अकोला, खंडवा, जळगाव या रेल्वे स्थानकांवर वृद्ध, दिव्यांगांसाठी बॅटरी कारची सुविधा उपलब्ध होईल, असे संकेत आहेत.
तूर्तास नागपूर, मुंबई रेल्वे स्थानकांवर बॅटरी कारची सुविधा उपलब्ध असून दिव्यांग, वृद्धांकडून प्रत्येकी ५० रुपये शुल्क आकारले जात आहेत. वृद्ध, दिव्यांगासोबत प्रवासादरम्यान असलेले साहित्यही कारमध्ये ने-आण करता येणार आहे.
----------------
भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधकांचे पत्र
अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकांवर वृद्ध, दिव्यांगासाठी बॅटरी कारची सुविधा सुरू करण्यासाठी भुसावळ मध्य रेल्वे मंडळ वाणिज्य प्रबंधकांचे पत्र धडकले आहे. या कारची सुविधा देताना त्यावर जाहिरातदेखील झळकणार आहे. रेल्वे स्थानकावर बॅटरी कार सुविधा पुरविणाऱ्या एजन्सीला ते उत्पन्नाचे साधन ठरणार आहे.
---------------------
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १ जुलैपासून होणार सुरू
पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीत खरी ठरलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. या गाडीचे आरक्षण मिळण्यास सुरुवात झाली आहे. अमरावती-सुरत पॅसेंजरसुद्धा सुरू होणार असल्याची माहिती अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक महेंद्र लोहकरे यांनी दिली. पुणे-काजीपेठ, मुंबई-पुणे, नागपूर-पुणे, पुणे-अमरावती, कोल्हापूर-नागपूर या रेल्वे गाड्यादेखील सुरू होणार आहेत.