श्रीमंत माने/गणेश वासनिक
नागपूर/अमरावती : निवडून येताच हातावरचे घड्याळ उतरवून हिंदुत्वाचा अजेंडा राबविणाऱ्या खासदार नवनीत राणा भाजप कार्यकर्त्यांना मात्र नको आहेत. वरिष्ठ भाजप नेत्यांच्या गुडबुकमध्ये असल्यामुळे भाजप त्यांना पाठिंबा देतो की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतो, याची उत्सुकता आहे. त्यातच राणा यांनी ज्यांचा पराभव केला ते आनंदराव अडसूळ आता शिंदे गटात म्हणजे महायुतीच्या तंबूत आहेत. परिणामी, अमरावतीची उमेदवारी ही भाजपची परीक्षा असेल, तर नवनीत राणा उद्धव ठाकरे गटाच्या हिटलिस्टवर असल्याने येणारी निवडणूक त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीची जागा भाजप लढविणार असल्याचे जाहीर केले खरे. परंतु, मतदारसंघात पक्षाची आमदारकीची पाटी कोरी आहे. जिल्ह्यातील एकमेव भाजप आमदार प्रताप अडसड यांचा धामणगाव रेल्वे वर्धा लोकसभा मतदारसंघात आहे. येथील सहापैकी अमरावती (सुलभा खोडके), तिवसा (यशोमती ठाकूर) व दर्यापूर (बळवंत वानखडे) हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. बडनेऱ्यातून खासदारांचे पती रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार आहेत, तर अचलपूर (बच्चू कडू) व मेळघाट (राजकुमार पटेल) हे मतदारसंघ प्रहार जनशक्ती पक्षाकडे आहेत.
या परिस्थितीत पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा नवनीत राणा यांचा मनसुबा भाजपच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठीच चार वर्षांपासून राणांचा ‘भाजप जप’ सुरूच आहे. हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. त्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांना साथ असली तरी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या नको आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातींसाठी राखीव झालेली ही जागा दोनवेळा शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी जिंकली. गेल्यावेळी नवनीत राणा यांनी त्यांचा ३६ हजार ९५१ मतांनी पराभव केला. पण, शिवसेनेतील फूट व राज्यातील सत्तांतरात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या महायुतीत आहेत. म्हणजेच राणा व अडसूळ एका तंबूत आले आहेत.
अडसूळ पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांनी दावा केला, तर भाजपला ही जागा शिंदे गटाला सोडावी लागेल. तथापि, अमरावती जिल्ह्यात शिंदे गटाची फारशी ताकद नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नवा चेहरा घेऊन लढावे लागेल. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण, राणा दाम्पत्याची तुरूंगवारी आदी कारणांमुळे अडसूळ यांच्यापेक्षा राणा यांच्यावर ठाकरे गटाचा राग अधिक आहे. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसला सोडण्याची अजिबात तयारी नाही. उमेदवारीसाठी ज. मो. अभ्यंकर, दिनेश बुब, प्रवीण काशीकर आदींची नावे चर्चेत आहेत. सुषमा अंधारे यांना अमरावतीत नवनीत राणा यांच्याविरूद्ध उतरवावे, अशी एक सूचना 'मातोश्री"वर पोहोचली आहे. तरीदेखील अमरावतीची जागा काँग्रेस लढवील आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे उमेदवार असतील, असे सुतोवाच ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मात्र लोकसभा निवडणुकीबाबत मौन बाळगले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघ २०१९ | २०१४
विधानसभा मतदारसंघनिहाय मते : २०१९ :: मतदारसंघनिहाय मते : २०१४
विधानसभा : नवनीत राणा - आनंदराव अडसूळ : आनंदराव अडसूळ - नवनीत राणा
- बडनेरा : ७६,०१० - ८६,४३९ : ९२,३६८ - ३४, ४४७
- अमरावती : ९६, ६४४ - ६८, ८७६ : ७०, २७१ - ५७,३७३
- तिवसा : ७६,५४७ - ७२,०३२ : ७८,९५२ - ४४,१६६
- दर्यापूर : ८९,७९७ - ७८,६६२ : ८१,४६५ - ६३,६५९
- मेळघाट : ९१,००८ - ७८,८६२ : ५८,२८५ - ७९,७८१
- अचलपूर : ७७,८३८ - ८५,६७८ : ८४,०२२ - ४९,१३०
पोस्टल : ३१०३ - ३४४७ : १८४९ - ७२४
एकूण : ५,१०,९४७ - ४,७३,९९६ : ४,६७,२१२ - ३,२९,२८०
२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांनी ६५ हजार १३५ मते घेतली. त्याआधी देवपारे २०१४ ची निवडणूक बसपाकडून लढले व ९८ हजार २०० मते घेतली.