अमरावती : खासगी क्षेत्रात मागासवर्गीयांना आरक्षण लागू करावे, या ठरावासह अन्य आठ ठराव आरक्षण बचाओ परिषदेत सर्वसंमतीने संमत करण्यात आले. पदोन्नतीतील आरक्षण मिळविण्याकरिता श्रमजीवींच्या प्रश्नांना सोबत घेऊन लोकचळवळ निर्माण व्हावी, असा एकमुखी सूर आरक्षण बचाओ परिषदेतून निघाला, हे विशेष.
आरक्षण बचाओ परिषद शनिवारी महादेव खोरी येथे पार पडली. परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भीमराव वाघमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे नेते मधुकर अभ्यंकर होतेे. मार्गदर्शक म्हणून आंबेडकरी विचारवंत प्रा. वामन गवई, डॉ. प्रमोद भालेराव, उपेक्षित महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, रिपाइंचे नेते वसंतराव गवई, समता परिषदेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक दहिकर, कास्ट्राईब संघटनेचे नेते पी.बी. इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य क्षीतिज अभ्यंकर, नगरसेवक प्रकाश बनसोड, एल.जे. वानखडे, खाटीक समाजाचे नीलेश पारडे, कॅप्टन महादेव शिरसाट, मल्हार सेनेचे सरसेनापती उमेश घुरडे, रिपाइं नेते रामेश्वर अभ्यंकर, माजी समाजकल्याण सभापती मिलिंद तायडे, माजी नगरसेवक मंगेश मनोहरे, भूषण बनसोड, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नामदेव गडलिंग, माजी नगरसेवक रामभाऊ पाटील, ॲड. सिध्दार्थ गायकवाड, दिगंबर झाटे, गोविंद फसाटे उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्राचार्य गजानन वानखडे यांनी, तर संचालन श्रीखंडे यांनी केले.