अमरावती : राज्यात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर आहे. नजीकच्या गावांतील स्थानिकांना हाताशी धरून बावरिया टोळ्या शिकारी करत असल्याचे उघड झाले आहे. दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या अलर्टनुसार देशासह विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, टिपेश्वर, नवेगाव- नागझिरा या अभयारण्यात वाघ तस्करीचे संकेत दिले आहेत.
ब्युरोच्या निर्देशानुसार मेळघाट आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर व गडचिरोली आणि गडचिरोलीजवळच्या आंबेशिवणी येथे काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाडसत्र राबविले. त्यात शिकारीच्या साहित्यासह संशयित सहा पुरुष, पाच महिला, पाच लहान मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, आता आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाब राज्यातील बावरिया टोळीने वाघ तस्करीचे जाळे पसरले आहे.
व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आवश्यक
व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन रखडल्याने वाघांचे संवर्धन, संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अद्यापही १० गावांचे पुनर्वसन झाले नसून ५५ कोटी निधीची गरज आहे. पेंचमध्ये ११० लोकसंख्येच्या फुलझरी या गावचे पुनर्वसन रखडले आहे.
५७ जणांचा पुनर्वसनाला नकार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २४४ कुटुंबे संख्या असलेल्या रानतडोदी या गावचे पुनर्वसन थांबले आहे.
पुनर्वसनास निधीची कमतरता नाही
व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आतापर्यंत पाच गावांचे पुनर्वसन झाले आहे. एकमात्र रानतडोदी हे गाव राहिले असून, पावसाअभावी ते थांबले आहे. - जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अधारी व्याघ्र प्रकल्प