विद्यापीठाचे निकाल लांबले : सात दिवसांचा ‘अल्टिमेटम’अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल उशिरा लागत असल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाने सोमवारी विद्यापीठात धडक देऊन कुलगुरूंना जाब विचारला. मात्र विद्यार्थ्यांची आक्रमकता बघून दोन दिवसांत निकाल लावण्याचा निर्णय घेत कुलगुरूंनी यातून मार्ग काढला.भाजयुमोचे जिल्हा महासचिव सोपान कनरेकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन विधी, अभियांत्रिकी, फार्मसीचे निकाल लांबणीवर पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. नियमानुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांत निकाल लावणे अपेक्षित आहे. मात्र, ७० ते ८० दिवसांचा कालावधी लोटला असताना अद्यापही निकाल लागलेले नाही. दुसरीकडे परीक्षा विभागाचे ‘डिजिटायझेशन’ झाल्याचा गवगवा केला जात असताना निकाल उशिरा का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विधी अभ्यासक्रमांच्या निकालासाठी दीर्घ कालावधीपासून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. अंतिम वर्षाचे निकाल त्वरित न लागल्यास अनेक विद्यार्थ्यांवर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विधी, अभियांत्रिकी व फार्मसीचे निकाल लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा मार्ग खडतर झाला आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा मंडळाचे संचालक जयंत वडते, विद्यार्थी कल्याण विभागाचे गणेश माल्टे उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल कंगाले, बादल डकरे, अंकुश घायर, मांगल्य निर्मळ, अशोक विश्वकर्मा, जुगल यादव, करण महल्ले, पूजा भागवत, ऋचा देशपांडे, आरती पोकळे आदींनी कुलगुरूंच्या दरबारात त्यांच्या समस्या मांडल्यात. (प्रतिनिधी)परीक्षा विभागाचा प्रवास तंत्रज्ञान व मॅन्युअल असा दोन प्रकारे चालतो. गतवर्षीपासून नवीन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रारंभ केला आहे. त्यामुळे स्थावर होण्यास काही अवधी लागेल. मात्र, हिवाळी परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबी अपूर्ण असून दोन दिवसांत निकाल लावण्याची तयारी केली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
भाजयुमोची धडक
By admin | Published: March 21, 2017 12:17 AM