अमरावती : कोरोनामुळे घरात वाढलेला वास्तव्याचा काळ व तापता उन्हाळा यामुळे विजेचा वापरही वाढणार आहे. विजेचे बिल हे आकारानुसारच येणार असले तरी अनावश्यक वापर टाळण्याचे आणि वेळेत वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंत्या सुचित्रा गुजर यांनी केले.
राज्यात कलम १४४ लागू झाल्याने संचारबंदीसह अत्यावश्यक सेवा वगळता ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले आहे. त्यामुळे संगणक, एसी, टीव्ही, पंखे, कूलर, मोबाईल आदी विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर जास्त वाढणार असल्याने त्याचा परिणाम वीज बिलावर होईल, हे वास्तव ग्राहकांनी लक्षात ठेवायला हवे. ही सुविधा अव्याहत सुरू ठेवण्यासाठी डिश, गॅस, मोबाईल याप्रमाणेच वीज बिल वेळेत भरण्याला प्राधान्य देण्यात यावे. एका क्लिकवर मोबाईल रिचार्जप्रमाणेच ग्राहकांना वीज बिल भरणा करता येते. याशिवाय वीज ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग झाले नसल्यास ग्राहकांना स्वत: रीडिंग पाठविण्याचीही व्यवस्था महावितरणने केली आहे.
कोरोनाकाळातही सेवा देताना अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील २१८ कर्मचाऱ्यांना वर्षभरात कोरोना संसर्ग झाला. एवढेच नव्हे तर तीन कर्मचाऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. अशा परिस्थितीतही अखंडित वीज सेवा देण्याचे महावितरणचे नियोजन आहे. ग्राहकांनीही जबाबदारीचे भान ठेवत वीज बिल भरण्याला प्राथमिकता द्यावी, असे आवाहन मुख्य अभियंत्यांनी केले.