शहरातील एका युवकाचा डेंग्युने मृत्यु ?
शहरातील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू?
चांदूर रेल्वे : शहर आणि परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी शहरातील एका युवकाचा डेंग्यूने खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मात्र, याला संबंधित प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही.
कोरोनाच्या दहशतीखाली आतापर्यंत नागरिक जगत असताना, सद्यस्थितीत कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र, आता डेंग्यू या आजाराने डोक वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. चांदूर रेल्वे शहरातील खासगी दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक रुग्ण अमरावती किंवा जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत. यामुळे प्रशासनसुद्धा सतर्क झाले असून उपाययोजना सुरू केल्या आहेत.
डेंग्यूमुळे चांदूर रेल्वे शहरातील ३० वर्षीय युवकावर नागपूर येथे उपचार सुरू होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मात्र, याबाबत प्रशासनाकडे माहिती उपलब्ध नव्हती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीसुद्धा आता सतर्क राहणे गरजेचे आहे. आवश्यक त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ताप, अशक्तपणा, थंडी वाजून येणे आदी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.
(बॉक्समध्ये घेणे)
सदर मृत व्यक्तीची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. अनेक रुग्ण परस्पर जाऊन खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यूबाबत सर्वेक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. उपाययोजनांसाठी नगर परिषदेला पत्र दिले आहे.
- डॉ. प्रफुल्ल मरसकोल्हे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय
----------------
सध्या चांदूर रेल्वे तालुक्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे. माझ्या रुग्णालयात दररोज तीन ते चार रुग्ण येतात. लोकांनी डास निर्मूलनाची काळजी घ्यावी. घरालगतच्या टाकाऊ वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.
- डॉ. क्रांतिसागर ढोले, संचालक, ढोले हॉस्पिटल
---------------
डेंग्यूबाबत चांदूर रेल्वे शहरात नगर परिषदेतर्फे फवारणी, नियमित नाली साफसाफई व रस्ता साफसफाई सुरू आहे. मुनादी फिरवून जनजागृती करण्यात येत आहे.
- राहुल इमले, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद