अपघाताने फुटले बिंग, भ्रष्टाचार चव्हाट्यावर
नांदगांव पेठ : उड्डाणपूल व महामार्ग बांधकामात देशातील नामवंत व अग्रगण्य असलेल्या एका कंपनीने येथील उड्डाणपूल निर्मितीत प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक आरोप आता होऊ लागला आहे. हा पूल केव्हाही कोसळू शकतो, असा दावा नागरिकांनी केला आहे. शुक्रवारी जनावरांच्या ट्रकचा अपघात झाल्याने या भ्रष्टाचाराचे बिंग फुटले. ट्रकची उड्डाणपुलाच्या कोपराला धडक लागताच आतून चक्क गिट्टी खाली कोसळली. विशेष म्हणजे, यामध्ये सिमेंटचा वापरच केला नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. ही परिस्थिती पाहता, उड्डाणपुलाच्या आतील भाग पोकळ असून, यामुळे उड्डाणपुलाला धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
अमरावती ते तळेगाव या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठ येथे कंत्राटदार कंपनीने आठ वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे बंधकाम केले. जवळजवळ एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या या उड्डाणपुलामध्ये पाया भरताना गिट्टीसोबत सिमेंटचा वापर करणे गरजेचे होते. मात्र, त्यावेळी सिमेंट न वापरणे आज अनेकांच्या जिवावर बेतले असते. शुक्रवारी जनावरांच्या कंटेनरची धडक लागताच उड्डाणपुलाचा कोपरा क्षतिग्रस्त झाला व आतील संपूर्ण गिट्टी बाहेर येऊन पडली. सदर अपघातग्रस्त भाग अत्यंत तकलादू झालेला असून, एका छोट्याशा अपघाताने उड्डाणपुलाची एक बाजू खिळखिळी झाली. छोट्याशा अपघाताने जर उड्डाणपूल क्षतिग्रस्त होत असेल, तर त्याचा दर्जा कसा असावा, असा सवाल नांदगाव पेठवासीयांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे दोन दिवसांपर्यंत नागपूर मार्गाची वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळविली आहे. काल अपघात झाल्याबरोबर संबंधित कंपनीने केलेला कारनामा झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमांनी हा प्रकार पुढे आणला. छोट्याशा अपघाताने एवढी गंभीर बाब उजेडात आली असून, या उड्डाणपुलाच्या बांधकामाची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट १
ती गिट्टी डागडुजीसाठी
जनावरांच्या कंटेनरने क्षतिग्रस्त झालेल्या उड्डाणपुलाजवळ पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी तसेच डागडुजी करण्यासाठी त्याठिकाणी गिट्टी आणून ठेवण्यात आली होती. ती उड्डाणपुलाच्या आतील गिट्टी नाही. माध्यमांचा गैरसमज झालेला आहे.
- व्ही.पी. ब्राम्हणकर, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प अधिकारी
कोट
कंटेनरची उड्डाणपुलाला धडक लागताच पुलाच्या आतमधून कोरडी गिट्टी पडून त्याठिकाणी थर लागला होता. असे वाटत होते की, पूल कोसळतोय की काय? मी घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे. संबंधित कंपनीने आता सारवासारव चालविली आहे.
- सुनील जवंजाळकर, प्रत्यक्षदर्शी
पान २ चे लिड