प्रदीप भाकरे अमरावती : मुलींनो, निर्भया बना, पोलीस २४ बाय ७ तुमच्या पाठीशी आहेत, अशी ग्वाही देत शहर पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलप्रमुखांनी विद्याथ्यांना ‘गुड टच- बॅड टच’चे धडे दिले. राजापेठ भागात कालपरवा एका अल्पवयीन मुलीचा गळा कापून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. त्या पाश्वभूमिवर भरोसा सेलच्या प्रमुख तथा पोलीस निरिक्षक दिप्ती ब्राम्हणे यांनी शुक्रवारी शाळा, महाविद्यालय, कॉलेज यांना भेटी दिल्या. तथा विद्यार्थांना गुडटच, बॅडटच, छेडछाड, चिडिमारी तसेच एकतर्फी प्रेमातून होणारा पाठलाग, होणारी दमदाटी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
असा कुठलाही प्रकार होत असल्यास, डायल ११२ सह १०९१ व १०९८ याटोल फ्री क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आग्रही आवाहन करण्यात आले. विद्यार्थी व मुख्याधापक, शिक्षकांना त्याबाबत अवगत करुन माहिती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय अमरावती शहर कार्यक्षेत्रातील महिलांना कुठल्याही प्रकारे छेडछाड, चिडिमारी, रोडरोमियो व इतर त्रास होत असल्यास निर्भय होऊन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस काका, दिदी पथक स्थापित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शहरातील बाबा कार्नर, पंचवटी चौक, शेगांव नाका, कठोरा नाका, गद्रे चौक इत्यादी गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग करुन महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये कार्यवाही देखील करण्यात आली.
पालकांनो, पाल्यांना सांगा, समजून घ्याआजकाल घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली आहे. मुलींना घराबाहेर पाठवताना किंवा अनोळखी व्यक्तीसोबत पाठवताना पालक दहा वेळा विचार करतात. तुमच्या वयात येत असलेल्या मुलींना काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे. कोणता माणूस कोणत्या हेतूने त्यांना स्पर्श करत आहे, हे त्यांना समजले पाहिजे. तुमच्या पाल्यासोबत मैत्रीचे नाते निर्माण करत तुम्ही त्यांना गुड टच आणि बॅड टचविषयीची माहिती सांगणे आवश्यक आहे. गुड टच आणि बॅड टच शिकवण्यासाठी तुम्ही काय करु शकता ते देखील पालक, शिक्षकांना सांगण्यात आले.
गुड टच, बॅड टचबाबत सांगाजर एखाद्या व्यक्तीने केलेला स्पर्श तुम्हाला आवडला नाही तर त्याला बॅड टच म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला चुकीच्या पद्धतीने हात लावत असेल तर तो बॅड टच आहे. जर एखादी व्यक्ती तुम्हाला प्रेमापोटी स्पर्श करत असेल किंवा डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असेल किंवा आजी आजोबा जवळ घेतात तसे प्रेमाने गळाभेट घेत असेल तर त्याला गुड टच मानले जाते, असे मार्गदर्शन करण्यात आले.