----------
लाँड्री व्यावसायिकाच्या घरात शिरून चोरी
अंजनगाव सुर्जी : काठीपुरा येथील बालाजी प्लॉटमध्ये घरीच लाँड्रीचा व्यवसाय करणाऱ्या ३६ वर्षीय महिलेला चहा बनविण्यास सांगून ३३ वर्षीय महिला (रा. अमरावती) हिने टेबलवरील पाच हजारांच्या तोरड्या लंपास केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. पोलिसांनी महिलेविद्द्ध गुन्हा दाखल केला.
------------
आकर्षण संपले युवतीला सोडले
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील १८ वर्षीय मुलीशी ती अल्पवयीन असताना मो. तलहासीफ मो. शफीउल्ला (२४) याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती असताना तिला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले व गर्भपात करून घरी सोडण्यात आले. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (एन) सहकलम ४, ८ पोक्सो अन्वये गुन्हा नोंदविला.
-----------
टाकळी येथे घर फोडले
नांदगाव खंडेश्वर : लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी येथे सरीख खान राऊख खान (२८) यांचे घर १९ मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्याने फोडले. अलमारीतील २० हजार रुपयांची सोन्याची पोत लंपास करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
----------
शेतातून गव्हाचे कट्टे लंपास
नेरपिंगळाई : कापूसतळणी शिवारातील डॉ. अभिजित मांडवे यांच्या शेतात काढणी झालेले गव्हाचे ११ कट्टे लंपास करण्यात आले. गोपाल रामकिसन धुर्वे (२८, रा. धानोरा) या सोकाऱ्याने माहुली जहागीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
---------
खोलापूर येथे चारचाकीची दुचाकीला धडक
दर्यापूर : खोलापूर ते दर्यापूर मार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे विजय वामनराव गाडे (४०, रा. भरताळा) यांच्यासह त्यांच्या मित्राला जबर दुखापत झाली. गाडे हे रस्त्यावर कोसळले, तर त्यांचा मित्र ट्रकवर आदळला. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७ सह १३४ मोवाका अन्वये गुन्हा नोंदविला.
----------
दर्यापुरात क्षुल्लक कारणावरून मारहाण
दर्यापूर : शहरातील नगर परिषद शाळेजवळ रोहन इंगळे याच्याशी अंकुश गवई (रा. भीमनगर) याने वाद घातला. रोहनच्या वडिलांनी त्याला समजविण्याच्या प्रयत्न केला असता, त्यांना मारहाण व दाताने चावा घेण्यात आला तसेच बहिणीलाही मारहाण केली. दर्यापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
--------------
चांदूर बाजारात दुचाकी लंपास
ब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार येथे सामानासाठी गेलेल्या राजेश विनोद सोलव (२६, रा. शिराळा) या युवकाची दुचाकी लंपास करण्यात आली. एमएच २७ सीई २४३६ क्रमांकाची ही दुचाकी १९ मार्च रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
---------
परतवाडा येथे दुचाकी लंपास
परतवाडा : सिव्हिल लाईन येथील श्यामलाल पुरुषोत्तम अग्रवाल (६०) यांनी घरापुढे उभी केलेली एमएच २७ डीआर ३३५९ क्रमांकाची दुचाकी १ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास लंपास करण्यात आली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी तक्रारीवरून २० मार्च रोजी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.
----------
गव्हाणकुंड येथे युवकाला मारहाण
जरूड-पुसला : गव्हाणकुंड येथे प्रकाचन मोहनलाल मोरले (३१) यांना मधुकर झारखंडे व त्याची मुले प्रतीक व पवन यांनी हाती दगड घेऊन मारहाण केली. २५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. वरूड पोलिसांनी २० मार्च रोजी गुन्हा दाखल केला.