-------------
९६ हजारांचे दागिने लंपास
चिखलदरा : तालुक्यातील आहाड या गावी घराच्या मागील दारातून शिरून चोरट्यांनी सोने-चांदीचे ९६ हजारांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी गजानन चिलात्रे (४५) यांनी चिखलदरा पोलिसांत गुन्हा नोंदविला. ते पत्नीसह बोर्डी येेथे कामाला गेल्यानंतर मुलाने घराचे मागील दार उघडे ठेवून कुलूप लावले. चोरट्यांनी ही संधी हेरून २९ जून रोजी भरदिवसा ही चोरी केली.
------------
पुसला येथून मंडपाचे साहित्य लंपास
शेंदूरजनाघाट : पुसला येथील बिछायत केंद्रामधून मंडपाचे आठ हजारांचे साहित्य लंपास करण्यात आले. याप्रकरणी जमादार संजय उदापुरे यांच्या फिर्यादीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी गणेश दिलीप गजभिये, राजू पारण्या तायवाडे, धर्मेंद्र लंकेश्वर बागडे (रा. पुसला) यांच्याविरुद्ध ३० जून रोजी गुन्हा नोंदविला.
------------
ऑनलाईन खरेदीत ५८ हजारांचा गंडा
वरूड : ऑनलाईन खरेदी केलेल्या साडीचे पार्सल परत करण्यासाठी संबंधित ॲपवर दिलेले ०८०६११७९९६०० या क्रमांकावर कॉल केला असता तो कट होऊन ९३३९०६८३७८ क्रमांकावरून एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. यानंतर बहिणीच्या खात्यातून १९ हजार ४३८ व ३८ हजार ४७० असे ५७ हजार ९०८ रुपये परस्पर वळते झाले. २८ जून रोजी घडलेल्या या प्रकाराची तक्रार श्रीकृष्णपेठ (मोर्शी) येथील २८ वर्षीय महिलेने केली. वरूड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३० जून रोजी गुन्हा नोंदविला.
---------------
सावंगी येथे मुलाची पित्याला मारहाण पुसला : तालुक्यातील सावंगी येथे ३० जून रोजी धनराज शंकर भाजीखाये यांना मुलगा आकाश धनराज भाजीखाये याने ३० जून रोजी सायंकाळी कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. घरात दारूचा धंदा करायचा आहे, असे सांगून मद्यधुंद अवस्थेतील आकाशने त्यांना घराबाहेर निघण्यास फर्मावले व जिवे मारण्याची धमकी दिली. वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------
वरूड येथे महिलेचा विनयभंग
जरूड : दुपारी वामकुक्षी करीत असलेल्या महिलेच्या घरात शिरून भूषण प्रभाकर भेलकर (३२, रा. भवानी चौक, वरूड) या युवकाने तिचा विनयभंग केला. विरोध केला असता, पोटावर लाथ मारली. ३० जून रोजी वरूड येथे ही घटना घडली. पोलिसांनी भादंविचे कलम ४५२, ३५४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.