अमरावती : ग्राहक बनून एका ज्वेलर्समध्ये शिरलेल्या भामट्या तरूणाने तेथील जवळपास ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे ७४ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही धक्कादायक घटना १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास सिटी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील जयस्तंभ चाैक रोडवरील तथा मालवीय चौक परिसरातील श्री अलंकार ज्वेलर्स आर्ट या प्रतिष्ठानात घडली. तो भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
जयस्तंभ मार्गावरील सहकार भवनजवळ नितीन पारेख (६५, रा. कॅम्प) यांचे श्री अलंकार ज्वेलर्स आर्ट नामक प्रतिष्ठान आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एक भामटा ग्राहक बनून त्यांच्या प्रतिष्ठानात गेला. त्याने अंगठी खरेदी करायची आहे, असे पारेख यांना म्हटले. त्यानुसार पारेख यांनी त्याला काही अंगठ्या दाखविल्या. त्यावर भामट्याने चार अंगठ्या आपल्या हाताच्या बोटात घातल्या. त्याचवेळी त्याने पारेख यांना ब्रेसलेट खरेदी करायचे आहे, असे म्हटले. त्यानुसार पारेख यांनी त्याला काही ब्रेसलेट दाखविले. त्यातील एक ब्रेसलेट भामट्याने आपल्या हाताला बांधले. त्यानंतर थुंकण्याचा बहाण्याने प्रतिष्ठानाबाहेर पडून भामट्याने तेथून पोबारा केला. ग्राहक बनून आलेला भामटा अंगठ्या व ब्रेसलेट घेऊन पसार झाल्याचे लक्षात आल्यावर पारेख यांनी तातडीने घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याबाबत माहिती मिळाल्यावर कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके व गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली.