लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गत ५८ दिवसांपासून संप पुकारला आहे. राज्य शासनाने विविध टप्प्यात वेतनवाढ जाहीर केली. दरमहा दहा तारखेच्या आत वेतन करण्याबाबत हमी घेतली आहे. तरीही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरे नव्हे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आजवर अडचणीचा सामना करून कर्तव्य बजावले आहे. त्यांना कमी वेतनात संसार करणे जिकरीचे जात आहे. हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे संप करणे काहीच गैर नाही. मात्र, या संपाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव देऊन वाढ केली. वेळेवर वेतन करण्याची हमी घेतली आहे. तरी संप मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संप कोठे तरी मिटविणे गरजेचे आहे.
दिवसभरात २२८७ जणांचा एस.टी.ने प्रवास- अमरावती विभागातील आठपैकी तीन आगारांमधून बुधवारी काही एसटी बस सोडण्यात आल्या. या माध्यमातून २२८७ जणांनी प्रवास केला. - अमरावती विभागातील अमरावती, मोर्शी, वरूड या तीन आगारातून बुधवारी १६ बस सोडण्यात आल्यात. मात्र, इतर आगारातून एकही बस सुटलेली नाही.
शासन सेवेत घेतल्याशिवाय माघार नाहीअतिशय तोकड्या पगारावर काम करून सेवा दिली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा हक्कासाठी सुरू आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत लढा चालूच राहील.- सतीश कडू, एसटी कर्मचारी
प्रवासी आमचे दैवत समजून सेवा केली आहे. ज्येष्ठापासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिक सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करून आमचा विश्वास सार्थ करावा व न्याय द्यावा. - श्रीकांत रोहनकर, वाहक
आतापर्यंत २७० निलंबित
संपात सहभागी झालेल्या अमरावती विभागातील २७० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय सहा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ११६ जण बडतर्फ केले आहे.