आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून विकसित होत असलेल्या बेलोरा विमानतळाच्या विकासकामांची पाहणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी केली. रखडलेल्या विकासकामांना त्वरेने गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत रेमंड लेनीन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी आले होते. बेलोरा विमानतळावर एकाच वेळी चार हेलिकॉप्टर हेलिपॅडवर बघून त्यांनी बेलोरा विमानतळ विकासाचा निर्णय किती योग्य होता, याचे समाधान व्यक्त केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विमानतळ विकासासंदर्भात पालकमंत्र्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना व्यक्तिश: लक्ष देऊन विमानतळाच्या विकास कामांमध्ये अधिक पूर्तता करायची असल्यास त्वरेने कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.जळू ते बेलोरा वळण मार्गाच्या कामांची पाहणी करून ते मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिल्यात.विमानतळ विकासासाठी सुनील देशमुखांचा आग्रह -मुख्यमंत्रीबेलोरा विमानतळाचा विकास व्हावा, यासाठी आमदार सुनील देशमुख यांचा विशेष आग्रह होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नांदगावपेठ येथील औद्योगिक वसाहत परिसरात कापड प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आवर्जून सांगितले. विमानतळामुळे विकासाला अनुरूप यंत्रणा उभी राहते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सुरक्षा भिंतीच्या सीमांकनाची पाहणीयेत्या काही महिन्यांत अमरावतीत टेक्सटाइल पार्कमध्ये आणखी काही उद्योग येत असून, यासाठी विमानतळ विकास झाला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिल्यात. या अनुषंगाने पालकमंत्री पोटे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत विमानतळ आणि परिसराची पाहणी केली. वनमाळी इन्फ्रा कंपनीकडे या मार्गाच्या निर्मितीची जबाबदारी आहे. त्याकरिता ११ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. जानेवारी २०१८ पर्यंत कामे पूर्ण होणार आहेत. पालकमंत्र्यांनी सुरक्षा भिंतीच्या सीमांकनाची पाहणी केली. उद्योजकांना आकृष्ट करण्यासाठी बेलोरा विमानतळाचा विकास व्हावा, ही सर्वपक्षीय आमदारांची इच्छा रास्त असल्याचेदेखील पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले.