माहितीचा अभाव : बँक अधिकारीही अनभिज्ञमोर्शी : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘जनधन योजने’संदर्भात लोकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे या योजनेंतर्गत खातेधारक बँक अधिकाऱ्यांना भांडावून सोडत आहेत.केंद्र शासनाने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अत्यंत घाईगर्दीत जनधन योजनेची घोषणा केली. त्या अंतर्गत बँकेची खाती उघडण्याचे लोकांना आवाहन करण्यात आले. बँक खातेदारांना १ लक्ष रुपयांचा लाभ देण्यात येईल, असा प्रचार करण्यात आला. योजना सुरु झाली त्यावेळी अनेक बँक अधिकाऱ्यांना या योजनेसंदर्भात कोणतीही माहिती नव्हती. बँकेच्या मुख्यालयातून आलेल्या फतव्यानुसार बँक अधिकाऱ्यांनी लोकांची खाती उघडणे सुरु केले होते. लोककल्याणकारी योजनेची माहिती तहसील कार्यालयास देण्याचा प्रघात आहे. परंतु तहसील कार्यालयाससुध्दा यासंदर्भात माहिती नव्हती. त्यामुळे ज्यांची पूर्वीच बँक खाती आहेत, अशांना या १ लक्ष रुपयांचा लाभ मिळेल किंवा नाही या शंकेपोटी काहींनी पुन्हा खाते नसलेल्या बँकेत जनधन योजनेसाठी खाती उघडली आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांना बऱ्याच उशिरा जनधन योजनेच्या कार्यान्वयन आणि खातेदारांना द्यावयाच्या लाभासंदर्भात माहिती देण्यात आली. या माध्यमातून खातेधारकाला अपघाती विमा योजने अंतर्गत १ लक्ष रुपयांचे संरक्षण देण्यात आले. खातेदारांचे अपघातात निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना एक लक्ष रुपयांचा विमा निधी देण्याची ही योजना आहे. नैसर्गिक मृत्यू, आणि आत्महत्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले नाही. परंतु या बाबीं संदर्भात अजूनही अनेक खातेदार अद्यापही अनभिज्ञच आहेत. खाते उघडल्यावर खातेधारकाला ५ हजार रुपयांचा ओव्हरड्र्र्र्राफ्ट देण्यात येईल, असेही केंद्र शासनाने घोषित केले होते. परंतु आतापर्यंत यासंदर्भात बँकेला कोणतेही आदेश किंवा निर्देश प्राप्त झालेले नाहीत. (तालुका प्रतिनिधी)
भंडावून सोडताहेत जनधन योजनेचे लाभार्थी
By admin | Published: November 22, 2014 10:53 PM