जलसंपदा मंत्र्यांसह लवकरच होणार बैठक, प्रलंबित सिंचन योजना मार्गी लागण्यासाठी पालकमंत्र्यांचा पाठपुरावा अमरावती : ७ हजार १०९ हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या व सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्वच गावांतील शेतीला समप्रमाणात होणार आहे, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिली.
मोर्शी स्थित अप्पर वर्धा धरणाच्या तिवसा तालुक्यातून गेलेल्या उजव्या मुख्य कालव्यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या हेतूने गुरुकुंज उपसा सिंचन योजना आकारास येत आहे. त्यासाठी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. याबाबत त्या म्हणाल्या, अडीचशे कोटी खर्चाच्या या योजनेतून गुरुदेवनगर, मोझरी, माळेगाव, शिवगाव, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोला बुद्रुक, घोटा, भांबोरा, कोडवन, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, वऱ्हा, वाठोडा खुर्द, रंभापूर, फत्तेपूर आदी गावांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून अंदाजे ७ हजार १०९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या योजनेतून सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत कुणीही संभ्रम बाळगू नये, असेही त्या म्हणाल्या.
माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांनी १९८४ मध्ये शेतकरी बांधवांना धरणाचे पाणी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार अप्पर वर्धा धरण प्रकल्प प्रशासनाने सर्वेक्षणसुद्धा केले होते. तथापि, ज्या गावातील शेतकऱ्यांनी ही मागणी केली होती, ती गावे उंच भागावर, तर कालवा सखल भागात असल्याने कालव्यातून पाणी देण्याबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्याकडून विकासाची दूरदृष्टी, शेतकरीहितासाठी कायम कटिबद्धता ठेवून शेतकऱ्यांच्या पाण्यावरील हक्कासाठी सातत्याने भूमिका मांडण्यात आली. ही भूमिका ठाम ठेवून आपणही सातत्याने विधीमंडळात पाठपुरावा केला आहे. त्यानुसार ‘मोझरी गुरुकुंज उपसा सिंचन योजना’ आकारास आली, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्र्यांसोबत लवकरच बैठक
योजनेची चाचणीसुद्धा पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते यावर्षी ३१ जुलै रोजी घेण्यात आली. पंप हाऊस व इतर सर्व कामे झाली, तर वितरणाची पन्नास टक्के काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा होत आहे. ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत विशेष बैठक लवकरच होणार आहे. यावेळी सर्व अडचणी दूर करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहितीही पालकमंत्री ठाकूर यांनी दिली.
000