अमरावती : आयपीएलमधील आरसीबी व्हर्सेस लखनौ सुपर जाएंटमध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान बेटिंग घेताना दोन सट्टेबाजांना अटक करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने १० एप्रिल रोजी रात्री ९.२० च्या सुमारास नवाथे चौक येथील महानगर पालिकेच्या मोकळ्या जागी ही कारवाई करण्यात आली. दोन्ही सट्टेबाज बनावट सॉफ्टवेअर व ॲपद्वारे खयवाडी व लागवडी करताना आढळून आले.
विनोद कुमार लक्ष्मीनारायणजी चांडक (४४) व तुषार मनोज चांडक (२९, दोघेही रा. स्वस्तिक नगर अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते रॉयल चॅलेंज बंगरूळू विरुद्ध लखनौ सुपर जाएन्ट या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईलमधील गुगल क्रोममध्ये ‘ओलाबेट बेट ऑन द बेस्ट ऑड्स’ या नावाचे गैरकायदेशीर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोनचे सहाय्याने बेटींग करतांना मिळून आले. ते बेकायदेशीर ॲप आपण आकाश चावरे (रा. औरंगपुरा अमरावती) याच्या कडून घेतले असून, त्याच्याचकडे आपण तो सट्टा उतरवित असल्याची कबुली दिली.
अटक आरोपींपैकी एकाच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग चेक केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या क्रमांकावरुन आलेल्या कॉलनुसार आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेऊन जुगार खेळविल्याच्या रेकॉर्डिंग दिसून आल्या. विनोद व तुषार चांडक यांना अटक करून राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तेथे त्यांच्याविरूध्द फसवणूक व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चावरे नॉट रिचेबल
सीपींच्या विशेष पथकाने आरोपी आकाश चावरे याचा शोध घेतला, ती मिळून आला नाही. तर दोन्ही अटक आरोपींकडून यांच्याकडुन ५६१० रुपये रोख व १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा जुगार माल जप्त करण्यात आला. सीपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने ही कारवाई केली. तीन दिवसांपुर्वी देखील राजापेठ पोलिसांनी शंकरनगर भागातून दिपेश नानवाणी याला अटक करून त्याचेकडून क्रिकेट बेटिंगसाठी वापरण्यात येणारे बोगस ॲप जप्त केले होते. त्यातील दोन आरोपी अदयाप फरार आहेत. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर व कंवरनगर, अंबिकानगर भाग अलिकडे बेटिंगचा हब बनू पाहत आहे.