अमरावती : भारत व न्यूझीलंड संघातील क्रिकेट सामन्यावर सातुर्णा येथे खेळवला जाणाऱ्या सट्टयावर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी धाड टाकली. या कारवाईत एका सट्टेबाजाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून २० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन वासुदेवराव येरोणे (३७, रा. सातुर्णा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातुर्णा येथे सचिन हा स्वत:च्या घरून मोबाइलवर वेगवेगळ्या बोगस आयडीच्या साहाय्याने भारत व न्यूझीलंड संघादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा तसेच जुगाराची खायवाडी व लागवाडी करीत असल्याची माहिती सीपींच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर सचिनच्या घरी धाड टाकली. या कारवाईत सचिनला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन मोबाइल, चार्जर व अन्य साहित्य असा २० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिन हा कॉस्को उर्फ अनिल मेटकर रा. देशपांडे प्लॉट याच्याकडून आयडी घेऊन सट्ट्याची लागवाडी करीत असल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले.
परतवाडयातून हलविली जातात सुत्रे
जुगाराची लागवाडी ही सोनू उदापुरे उर्फ उदापूरकर (रा. परतवाडा) याच्याकडे करीत असल्याचे कबुली आरोपी सचीनने विशेष पथकाला दिली. सचिन येरोणे याला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, दीपक श्रीवास्तव, राजीक रायलीवाले, निखिल गेडाम, लखन खुशराज, रोशन वऱ्हाडे यांनी केली.
तीन वर्षांपूर्वी अंजनगाव शहरात क्रिकेट सट्टयावर धाड घालण्यात आली होती. त्यावेळी देखील उदापूरकरचे नाव उघड झाले होते. वरूड शहरातील आयपीएल जुगाराचे तार देखील त्याच्याशी जुळले असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सोनू उदापुरे उर्फ उदापुरकरला अटक केल्यास आयपीएल सट्ट्याचा उलगडा होऊ शकतो.
सीपींचे विशेष पथक जोरात
नागपुरी गेट हद्दीतून गोवंशाची मोठी तस्करी रोखण्यात सीपींच्या विशेष पथकाला यश आले. तर, लगेचच त्या पथकाने भातकुलीत तांदळाचा मोठा अवैध साठा पकडला. तर, राजापेठ हद्दीतील बनावट सिमेंटचा कारखाना उध्वस्त करून सीपी डॉ. आरती सिंह यांना अपेक्षित स्ट्रॉंग पोलिसिंगचा आदर्श वस्तुपाठ विशेष पथकाने घालून दिला. त्यामुळे शहर पोलीस दलात सध्या सीपींचे विशेष पथक जोरात असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.