श्यामकांत पाण्डेय
धारणी : मेळघाटात ‘ऐकावे तेच नवलच’ अशा घटना घडतच असतात. काहींना काही कारणांनी मेळघाट प्रसिध्दी झोतात असते. अशातच धारणी व ग्रामीण भागातील पोलिसांचे तथाकथित गुप्तचर चर्चेचा विषय ठरला आहे. शहर व तालुक्यात पोलिसांचे ७०० च्या आसपास ‘खबरे’ असल्याची माहिती आहे.
धारणी तालुक्यात जवळपास १५५ गाव आणि चिखलदरा तालुक्यातील १५ अशा जवळपास १७० गावांचा डोलारा धारणी पोलीस ठाण्यावर अवलंबून आहे. जवळपास दीड लाख लोकसंख्या, विस्तारित भौगोलिक क्षेत्रामुळे १७० गावांत शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी इंग्रज काळापासून शहराच्या उंच भागावर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून धारणी तालुकास्थळी केवळ एक पोलीस ठाणे आणि जवळपास ७० कर्मचारी आहेत. या दीड लाख लोकसंख्येवर ७० कर्मचारी कशाप्रकारे अंकुश ठेवत असतील, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. मात्र, त्यामागील कारण शोधले असता, तालुक्यात जवळपास ७०० तथाकथित गुप्तचर अर्थात पोलीस मित्र असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. एकट्या धारणी शहरातच शंभराच्या घरात पोलिसांना माहिती देणारे असल्याची माहिती आहे.
पोलीस यंत्रणेला पूरक
सूत्रानुसार, प्रत्येक गुन्हेगाराच्या लहान-सहान हालचालींवर तथाकथित गुप्तचर नजर ठेवून आहेत. पोलीस यंत्रणेला सहाय्य करणारे हे गुप्तचर अवघ्या काही मिनिटांत घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवितात आणि गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी होते.
म्होरक्यांवर व्हावी कारवाई
तालुक्यातील अवैध गांजा विक्री, अवैध दारू अशा गुन्ह्यात सहभागी असलेले मास्टर माईंड नेहमीच पडद्याआड राहतात. वेळ प्रसंगी धाड पडल्यास अड्ड्यावर काम करणाऱ्या लहान व्यक्तीला सामोरे केले जाते. त्यामुळे अशांवर कारवाईबरोबरच मोठे मासे देखील गळाला लावावेत, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.