लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अमरावती शहरात नव्याने सहा कोरोना पॉझिटिव्ह, तर एक रुग्ण स्वाइन फ्लूचा आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. बुधवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या नमुने चाचणीच्या अहवालातून ही बाब निदर्शनास आली आहे. त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेने उपाययोजना आखण्यास प्रारंभ केले असून, नमुने तपासणीवर भर दिला जाणार आहे.
हल्ली पावसाळा असल्यामुळे वातावरणातील बदल आणि साथरोगांची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कोरोनाने डोके वर काढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यंदा उन्हाळ्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता पावसाळ्यात साथरोगांची लागण वाढली असून, शासकीय खासगी रुग्णालयात रुग्णाची संख्या दरदिवशी वाढतच आहे. अशातच जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून २४ ते ३० जुलै यादरम्यान एकूण १४० जणांचे नमुने चाचणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविले असता यात सहाजण कोरोना पॉसिटीव्ह, तर एक रुग्ण स्वाईन फ्लूचा आढळला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या ६० वर्षीय रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय हाऊसफुल्ल, नव्याने आव्हान
- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गत १५ दिवसांपासून साथरोगाचे रुग्ण वाढले आहेत. एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार ही अलीकडे नित्याचीच बाब झाली आहे. तर तोकड्या कर्मचारी व्यवस्थेमुळे इर्विन'ची आरोग्य यंत्रणा सलाइनवर असल्याचे वास्तव आहे.
- अशातच आता कोरोनाचे नवे आव्हान उभे ठाकल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणासमोर निधी आणि कर्मचारी अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
सहा पॉझिटिव्ह रुग्ण शहरातीलचअमरावती विद्यापीठाने १४० नमुन्यांची तपासणी केली असून यात सहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात अंबा विहार येथील ५५ वर्षीय पुरुष, साईनगर येथील ३२ वर्षीय युवक, गोपालनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, विलासनगर येथील ५६ वर्षीय पुरुष, सराफा काळाराम मंदिर येथील २४ वर्षीय युवक, तारखेडा येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून समावेश आहे. १४० जणांमध्ये ४३ महिलांचे नमुने चाचणीकरिता पाठविले असता यात एकाही महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
"जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून २४ ते ३० जुलै यादरम्यान घेण्यात आलेल्या १४० जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात सहाजण कोरोना पॉझिटिव्ह, तर एकजण स्वाइन फ्लूची लागण असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. वातावरणातील बदलामुळे कोरोनाचे रुग्ण आढळून येत असावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे."- प्रशांत ठाकरे, नोडल अधिकारी, प्रयोगशाळा, अमरावती विद्यापीठ.