हभप गोदावरीबाई बंड : संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव घुईखेड : श्रीमद् भागवत कथेचा प्रारंभ श्रीकृष्णाने होत असून भागवत शब्दाचा अर्थ परमेश्वर. परमेश्वराचा खरा भक्त हा आपल्या दैनंदिन जीवनात चांगल्या आचरणाच्या मागे सर्वांसाठी धावणारा एक सेवक असतो़ भागवत कथेतून हे सारं उघड होते़ भागवत म्हणजे भक्तीरसाचे भांडार असल्याचे उद्गार हभप गोदावरीबाई बंड यांनी काढले़ घुईखेड येथे दोन दिवसांपासून संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरूवात झाली आहे़ त्यानिमित्ताने दररोज सकाळी हभप गोदावरीबाई बंड यांचे भागवत आयोजित केले आहे़ शेकडो भाविकांच्या उपस्थितीत त्यांनी पहिल्या दिवशी ‘भागवत व प्रेम’ याविषयी कथासार मांडला़ सारे विश्व हे प्रेमासाठी व्याकुळ आहे़ परंतु प्रेम या शब्दाचा अर्थ सापडत नाही़ माणूस जेव्हा परमेश्वराचे स्मरण करतो, त्यावेळी त्याचे मन जगातल्या इतर गोष्टींकडे असते़ मन स्थिर असल्याशिवाय ध्यान प्राप्त होत नाही़ वैदिक तत्वामध्ये ध्यान हे विष्णूला व कृष्णाला म्हटले आहे़ भक्तीद्वारे आपण आपली कामनापूर्ती करू शकतो. विष्णूला कोणताही मित्र व प्रेयसी नव्हती. त्याला फक्त पत्नी होती़ त्यामुळे पती-पत्नीचे नाते हे धर्माचे प्रतीक होय. दैनंदिन कीर्तनात हभप नामदेव महाराज, हभप मोहोड महाराज, हभप नीलेश महाराज, हभप दिलीप महाराज रोकडे, हभपपडोळे महाराज, हभप विजय महाराज गव्हाने, हभप योगेश महाराज खवले, हभप उमेश महाराज जाधव यांचे सात दिवस कीर्तन तर दुपार दरम्यान बजरंग मंडळ, गुरूदेव सेवामंडळ, महिला भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळाच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे़ ४ फेब्रुवारीला संजीवनी समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले़ या दिवशी गोपाल काला, दहीहांडी व राज्यातील दिंड्या या दिंडी महोत्सवात सहभागी होणार आहे. (वार्ताहर)
भागवत हे भक्तीरसाचे भांडार
By admin | Published: January 31, 2017 12:24 AM