इशारा : ११ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याची मागणी अमरावती : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यपदाचा वाद आता ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह दोन माजी सभापतींनी अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालन्यात भजन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे विषय समित्यांचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. यासंदर्भात माजी अध्यक्ष सुरेश ठाकरे, माजी आरोग्य सभापती मनोहर सुने तसेच माजी समाजकल्याण सभापती चंद्रपाल तुरकाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. नियमानुसार जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना तसेच पंचायत समितीच्या विद्यमान सभापतींना कुठल्याही एका समितीवर सदस्यसत्व अनिवार्य आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून या प्रक्रियेत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप या माजी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्यासह माजी आरोग्य व वित्त सभापती मनोहर सुने, समाजकल्याण सभापती चंद्रपाल तुरकाने व अन्य १४ पंचायत समितीचे सभापती सदस्य पदापासून वंचित राहिले आहेत. समितीमध्ये प्रतिनिधित्व नसल्याने ग्रामीण भागातील समस्या मांडता येत नाहीत. अध्यक्ष स्वत:चे अधिकार वापरत नसल्याने हा प्रकार अधिकाराचे हनन करणारा ठरत आहे, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच आता ११ जानेवारी पासून अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर भजन सत्याग्रह करण्याचा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेत सत्ताधारी पक्ष मुद्दाम समिती सदस्यत्व देण्यास टाळाटाळ करीत आहे. एका वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. त्यामुळे आमच्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन हाच पर्याय उरला आहे. (प्रतिनिधी)
सीईओ अध्यक्षांच्या दालनात करणार भजन
By admin | Published: January 02, 2016 8:29 AM