अमरावती : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीत काळाबाजार होऊ नये, यावर वाॅच ठेवण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. कृषी निविष्ठाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची तपासणी या पथकाकडून केली जाणार आहे.
खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे खते मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे आणि बियाणे खते कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी निविष्ठांचा काळाबाजार रोखण्याच्या दृष्टीने लक्ष ठेवण्याकरिता कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील १४ तालुक्यांत प्रत्येकी १ व जिल्हास्तरावर १ असे १५ पथके निश्चित करण्यात आली आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारीवरून तपासणीदेखील या भरारी पथकाकडून केली जाणार आहे. जिल्ह्यात कृषी विकास अधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय भरारी पथक आणि प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकारी यांचे नेतृत्वात तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे.
बॉक्स
झेडपी कृषि विभागात नियंत्रण कक्ष
कृषी निविष्ठाबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी तसेच तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे . जिल्हास्तरावर जिल्हा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात केला आहे.
कोट
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकर्यांना त्रास होणार नाही यासाठी कृषी विभागाच्यावतीने निविष्ठांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच तक्रारीची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात व तालुका स्तरावर भरारी पथके गठीत केली आहे.यासोबत नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे.
- उज्ज्वल आगरकर,
कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद