किशोर लेंडे
भातकुली : येथील महाराष्ट्र बँकेत एक कर्मचारी ग्राहकांसोबत अरेरावी करतो. खातेदारांशी गैरवर्तणुकीमुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात बँकेच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठांनी दखल घेऊन या कर्मचाऱ्याला समज द्यावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील जैन मंदिर व्यापारी संकुलात महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. या बॅंकेशी आसरा परिसरातील खातेदारांसह भातकुली येथील खातेदार संलग्न आहेत. यात शेतकरी, शेतमजूर व वृद्ध खातेदारदेखील आहेत. त्यामुळे लोकांची गर्दी या बँकेत नेहमीच दिसून येते. मात्र, बँकेतील एक कर्मचारी ग्राहकांसोबत अरेरावीची भाषा बोलत असल्याने खातेदारांत असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी बँकेचे शाखाधिका०यांशी संपर्क साधून या कर्मचाऱ्याला समज देण्याची विनंतीदेखील केली. मात्र, या कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीत अद्याप सुधारणा झालेली नसल्याने ग्राहकांची तक्रार कायम आहे. या विषयात बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
---------------
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पायमल्ली
जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्या उच्चांक गाठत असताना, या बँकेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात नाही. ग्राहकांना मास्क नाही तसेच त्यांच्यासाठी सॅनिटायझरची सुविधा नाही. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबींकडे बँक प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत.
----------------------
कर्मचाऱ्यांची अनुपस्थितीने ग्राहक त्रस्त
महाराष्ट्र बँकेत मोठया प्रमाणात खातेदार असल्याने ग्राहकांची गर्दी होते. मात्र, अनेकदा कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने खातेदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासंदर्भात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधण्याची मागणी खातेदारांनी केली आहे.
-------------------------------------------
ग्राहकाचा कोट येत आहे.