फोटो पी ३० चुरणी
चुरणी : मेळघाट विदर्भात आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळख असलेला भाग असून, आदिवासी समाजाचे प्राबल्य जास्त व ठळक वैशिष्ट्य. हा समाज सध्याच्या आधुनिक काळात निसर्गाला जपत असून, आपल्या परंपरागत चाली, रिती जतन करण्याकडे कल आहे. निसर्गालाच ईश्वराचे स्वरुप मानतो. ज्येष्ठ महिन्यात (आदिवासींच्या आखाजी घोमेज म्हणजे अक्षय तृृतीयेच्या मासात) रोहिणी नक्षत्राची सुरुवात होताच भवई उत्सव (सण) हर्षोल्हासात साजरा केला जातो.
या उत्सवास विशेष महत्व दिले जाते. आदिवासी समाजासह गवळी, गवलान, बलई, राठ्या समाजही या पूजनात सहभागी होताना दिसून येतो. ही पूजा म्हणजेच खरीप पिकाच्या हंगामाची नांदीच म्हणता येईल.
या पूजेत बांबू व आपल्या शेतात उत्पादित पिकातून परिपक्व सुदृढ शेतवाणाच्या बियाण्यास प्राधान्य व मानाचे स्थान आहे. मेळघाटातील प्रत्येक घरी या सणाच्या औचित्यावर जंगलातील बांबूची फांदी / काठी आणून त्याची पूजा केली जाते. नंतर हीच काठी शेतकाम करताना बैल हाकण्याकरिता वापरली जाते. गावपंचायत जमवून यंदा कोणते पिकाची पेरणी करायची, कुठल्या पिकाचे उत्पादन लाभकारक ठरेल, याचा अंदाज घेतला जातो. बी - बियाण्याचेही पूजन केले जाते. सर्व प्रकारचे धान्य प्रत्येक घरातून गोळा करून त्याचे वाटप भूमकाबाबातर्फे सर्वांना केले जाते. महामारीसारख्या रोगाची लागण न होण्याची प्रार्थना करून देवास साकडे घातले जाते.
कोदो, कुटकी, सावा, राळा, जगणी, भादली, ज्वारी, बाजरी, गहू, धान, सूर्यफुल, मूग, भुईमूग, मका, चणा, मसूर, बरबटी, तीळ, इत्यादी बियाण्यास भवई पूजेत स्थान दिले जाते.
पावसाळ्याची सुरुवात होण्यापूर्वी पर्ज्यन्यराजास जोरदार बरसण्याचे आवाहन केले जाते. गावातील मुले आदिवासी नृृृृत्य करत डेरे बाबा... डेरे बाबा... पाणी डे, भाजीपाला सुख गये पाणी डे, अशी आर्जव करत पावसाला जास्त प्रमाणात बरसण्याची विनंती करतात. माहे मेमध्ये जैवविविधता दिन साजरा केला जातो. मात्र, मेळघाटातील आदिवासी बांधवांना जागतिक दिवसाशी काही देणेघेणे नसले तरी भवई पूजा काडीबुडी पूजा यानिमित्ताने वनांचे पूजन करून जंगलाप्रती कृृृतज्ञता व्यक्त केली जाते. जगावेगळ्या पूर्वजानी घालून दिलेल्या रुढी परंपरांचे संस्कृृृृतीचे पालन करतात एवढे मात्र निश्चित.