जरूड : वरूड तालुक्यात वाढते कोविड रुग्ण व मृत्यूमध्ये होत असलेली भरमसाठ वाढ बघता वरूड येथे कोविड रुग्णालय स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
वरूड परिसरात दररोज १०० चेवर रुग्ण कोरोनाबाधित निघत आहेत. त्यात मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. ५०० च्या आसपास संशयित गावभर फिरत आहे. इतकेच नव्हे तर शासकीय नियमानुसार गृह विलागीकरणात ठेवलेले रुग्ण अलग न राहता दाढी कटिंगसह आपले सर्व दैनंदिन व्यवहार गावभर फिरून पूर्ण करीत असतात. त्यामुळे वरूड परिसरात कम्युनिटी स्प्रेड वेगाने वाढत आहे.
परिसरातील सर्व रुग्ण तब्बल ९० कि.मी अंतरावर अमरावतीला आणि १०० कि.मी अंतरावर नागपूरला पाठवावे लागत आहेत. परंतु तेथेही बेड शिल्लक नसल्यामुळे रुग्णांना मरणाच्या दारात सोडण्याची विदारक स्थिती नातेवाईकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक कुचंबणा होते व तिथे योग्य मार्गदर्शन व निवाऱ्याची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे वरूडमध्येच शासकीय कोविड रुग्णालय उभारावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. त्यासाठी तहसील कार्यालयाची नवीन इमारत किंवा पशू वैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत हे पर्याय उपलब्ध आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख यांचे शासन दरबारी वजन असून पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून किमान ५० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.