लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राणा दाम्पत्याच्या घरासमोर संविधान प्रस्तावना वाचण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. त्यामुळे पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या घरापासून ५०० मीटर अंतरावरच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अडवले. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी याचठिकाणी संविधान प्रस्तावनेचे वाचन करत, राणा दाम्पत्याविरोधान जोरदार घोषणाबाजी करत संविधानाचा जयघोष केला. यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हे नोंदवून सोडून दिले. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना जनतेने विकासासाठी निवडून दिले. परंतु राणा दाम्पत्य हे विकासाची कामे सोडून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भीम आर्मी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे भीम आर्मीने राणा दाम्पत्याच्या घरासमोर संविधान प्रस्तावना वाचण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनुचित घटना घडू नये यासाठी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लागला होता. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या घरापासून ५०० मीटर अंतरावरच अडवले. यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे, प्रदीप उसरे, आकाश इंगळे, अक्षय देशमुख, दीपक बोरकर, किरण काठाणे, भूषण चव्हाण, आकाश डोळस, अमर डोळस, अजय डोळस, हरिष देशमुख, सैय्यद नाझिम, शेख शारुक आदी उपस्थित होते.
संविधान वाचण्यासाठी घराबाहेर पाय पडेना
खासदार नवनीत राणा यांनी आता थेट काश्मीरमध्ये हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे म्हटले आहे. तर शुक्रवारी भीम आर्मीने राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर संविधान प्रस्तावना वाचण्याचा इशारा दिला होता. परंतु, पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना राणा दाम्पत्याच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेतले. त्यामुळे युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत संविधान प्रस्तावनेचे वाचन केले. या प्रस्तावना वाचनाच्या वेळी खासदार राणा या घरीच होत्या. परंतु त्या संविधान प्रस्तावनेच्या वाचनासाठी कार्यकर्त्यांसोबत न आल्याने घराबाहेर पाय का पडत नाही, अशी चर्चा रंगली.