अमरावती : भूदान यज्ञ मंडळाद्वारे मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील भूमिहीन व्यक्तींना पट्टा दिलेल्या १४ प्रकरणात शर्तभंग झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत तहसीलदार, एसडीओ व जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र दिले असतानाही गंभीरतेने घेतल्या जात नसल्यानेच प्रकारात वाढ होत असल्याबाबत भूदान यज्ञ मंडळाने चिंता व्यक्त केली.
भूदान यज्ञ मंडळाद्वारा जिल्ह्यात पट्टा दिलेल्या भूधारकांद्वारा शर्तभंग झालेली प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आलीय यात एकट्या नेरपिंगळाई गावातील १४ प्रकरणे असल्याची धक्कादायक बाब आहे. यासंदर्भात भूदान मंडळाद्वारा वेळोवेळी नेरपिंगळाई येथील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी वारंवार संपर्क केला असताना याप्रकरणी अनास्था व असहकार्याची भावना असल्यानेच या कार्यालयाचा भूदान जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप मंडळाचे संयुक्त सचिव नरेंद्र बैस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५७ अन्वये तलाठ्यांनी केलेल्या नोंदीचा या कार्यालयांनी पुरेपूर बैस यांनी निवेदनात केला आहे. अधिकार अभिलेखात चुकीच्या नोंदी घेतल्याबाबत या कार्यालयांना दोषी धरून कारवाई करण्याची मागणी बैस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
बॉक्स
या गट क्रमांकामध्ये शर्तभंग
नेरपिंगळाई येथे भूदान जमिनीच्या विक्रीद्वारे हस्तांतरप्रकरणी भूदान यज्ञ मंडळाचे अधिनियम १९५३ कलम २४ व खंड (सी) नुसार सामूहिक उल्लंघन व नियमबाह्य नोंदी झाल्या आहेत. यात गट क्रं १२९/१, १३१/१, १३१/२, १३१/३, १४९/१, १४९/१८, १७०/१ ते १७०/७ व ४८४/३ मध्ये शर्तभंग झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी बैस यांनी केली.