लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये फलक लावण्यावरून आणि श्रेयवादातून जोरदार घोषणाबाजी अन् तू-तू-मै-मै झाली. त्यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम शनिवारी चांगलेच गाजले. तिन्ही तालुक्यांमध्ये हा पॉलिटिकल ड्रामा सुरू होता. दरम्यान, पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मध्यस्थी करीत शासकीय नियमानुसार नव्याने फलक लावण्याचे आदेश दिल्याने हा वाद तात्पुरता शमला. मात्र, प्रत्येक भूमिपूजनस्थळी आजी-माजी आमदारांचे समर्थक घोषणा देत होते. त्यामुळे हे भूमिपूजन शासकीय की राजकीय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत धामणगाव रेल्वे मतदारसंघात रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. लोणी येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू असताना धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड समर्थकांसह तेथे पोहोचले. या कार्यक्रमाची आपल्याला कल्पनाही देण्यात आली नव्हती, ही बाब त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तयार करण्यात आलेले फलकही शासकीय नियमानुसार नसल्याचे आमदार अडसड यांनी पालकमंत्र्यांना सांगताच ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सुधारित फलक लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार प्रताप अडसड पुढील कार्यक्रमात सामील झाले. मात्र, यावेळी या घटनाक्रमाच्या अनुषंगाने पॉलिटिकल ड्रामा सुरू झाला तो पालकमंत्र्यांनाही अपेक्षित नव्हता. आमदार प्रताप अडसड आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या समर्थकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तापले होते. दोन्ही नेत्यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. आपापल्या पक्षांचे झेंडे झळकावले. आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून धरले. नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तिन्ही तालुक्यात विविध विकासकामांच्या भूमिपूजनावरुन राजकारण तापले असताना प्रशासनाने मात्र चुप्पी साधल्याचे दिसून आले. तर कार्यकर्ते आक्रमक होते.
अन् पालकमंत्र्यांनी दाखविले राजकीय सामंजस्यधामणगाव रेल्वे मतदारसंघात शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते घेण्यात आले, मात्र, अनवधानाने आयोजकांकडून आमदार प्रताप अडसड यांचे नाव भूमिपूजन फलकावर टाकण्यात आले नव्हते. ही बाब शासकीय कार्यक्रमात नियमसंगत नाही, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे भूमिपूजनाच्या सर्व फलकांवर आमदार प्रताप अडसड यांचे नाव अंकित करून नव्याने फलक लावा, असा पवित्रा ठाकुरांनी घेतला आणि राजकीय सामंजस्य दाखविले. त्यामुळे आजी-माजी आमदार समर्थकांमधील भूमिपूजन फलकाचा वाद थांबला.
शासकीय कार्यक्रम असो वा भूमिपूजन, यात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलू नये, असा प्रोटोकॉल आहे. तथापि, शनिवारच्या भूमिपूजन कार्यक्रमाची आपणास माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. एवढेच नव्हे तर आमदार म्हणून आपले नाव नव्हते. ही बाब आपण पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी लगेच याची दखल घेतली. आपला पालकमंत्र्यांवर कुठलाही आक्षेप नाही. माजी आमदारांनी राजकीय पोळी शेकण्यासाठी पालकमंत्र्यांना अंधारात ठेवले. - प्रताप अडसड आमदार, धामणगाव रेल्वे
दोन महिन्यांपूर्वी खासदार व आमदार यांनी पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना न बोलावता परस्पर भूमिपूजन उरकले होते. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता, पालकमंत्र्यांना बोलावून हे भूमिपूजन घ्यावे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. - वीरेंद्र जगताप, माजी आमदार
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अशा तीन यंत्रणांच्या विविध कामांचे भूमिपूजन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी धामणगाव मतदारसंघात होते. भूमिपूजनाचे फलक कोणत्याही यंत्रणांनी लावले नाहीत. मात्र, शासकीय नियमानुसार भूमिपूजन फलक लावण्यासंदर्भात पालकमंत्री सूचना देतील, तशी कार्यवाही केली जाईल.आय. आय. खान, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, अमरावती