-----------------------
नंबर लावण्यावरून ट्रकचालकात वाद
अमरावती : नंबर लावण्यावरून झालेल्या वादात एकाने दुसऱ्या चालकाच्या पायाला चक्का मारून दुखापत केल्याची घटना ट्रान्सपोर्टनगरातील स्टार गॅरेजसमोर १५ जुलै रोजी घडली. अलीम खान शब्बीर खान यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी रिजवान, इरफान (रा. पठाण चौक) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------
आमरस्त्यावर हातगाडी लावून वाहतुकीस अडथळा
अमरावती : सार्वजिनक रस्त्यावर हातगाडी उभी करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपी संतोष सदाशिव चव्हाण (४५, रा. विलासनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला. हा प्रकार संत गाडगेबाबा मंदिरासमोर १४ जुलै रोजी घडला.
--------------------
रस्त्यावर फळविक्री केल्याने गुन्हा दाखल
अमरावती : संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोर हातगाडी लावून फळ विक्री करताना वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. शेख इरफान अ. कलाम (३६, रा. धरमकाटा) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार १४ जुलै रोजी घडला.
-------------------------
कोरोना नियमाचे उल्लंघन, गुन्हा दाखल
अमरावती : कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत सोशल डिस्टन्स न पाळता बिनधास्त पानटपरी सुरू असल्याचे राजापेठ पोलिसांना गस्तीदरम्यान निदर्शनास आले. यावरून विचारणा केली असता उद्धट उत्तर दिल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. अमित राजबहादर यादव (२३, रा. देशपांडे वाडी) असे आरोपीचे नाव आहे.
-----------------
कापड व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये वेळेचे पालन न करता दुकान सुरूच ठेवल्याप्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना बापट चौकात १४ जुलै रोजी दुपारी ४ नंतर घडली.
-------------------------
आदेशाचे उल्लंघन, गुन्हा दाखल
अमरावती : वेळेनंतरही दुकान सुरूच ठेवल्याचे सिटी कोतवाली पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान निदर्शनास आले. याप्रकरणी वैष्णवी पर्सचे मालक आकाश ठाकुमल मोटवानी (२८, रा. नानक नगर) विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना १४ जुलै रोजी घडली.
-------------------
बालकाशी संबंधित अश्लील फोटो व्हायरल
अमरावती : इंस्टाग्रामवरून बालकासंबंधित अश्लील फोटो व्हायरल केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी उघड झाली. सायबर पोलिसांत आलेल्या तक्रारीवरून त्या इंस्टाग्राम प्रोफाईल नामक युवकाविरुद्ध १४ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
------------------
३२७० रुपयांचा जुगार पकडला
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी जुगारावर टाकलेल्या धाडीत ३२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना १३ जुलै रोजी उघड झाली. आरोपी सुभाष मंडले, हकीम चौधरी, शेख अस्लम शेख खलील, हिरा चौधरी, सुरेश बोरकर व फरार आरोपी विजय मंडले विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------
३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी जुगार व दारु अड्ड्यावर धाड टाकून ३.२० लाख १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैधरीत्या दारू विक्री केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. आरोपी प्रितेश दिलीप उसरटे (रा. मसानगंज) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------
वाहनावरून कोसळल्याने महिलेचा मृत्यू
भातकुली : मुलीच्या घरी भेटीला मुलाच्या दुचाकीने जात असताना कोसळल्याने ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिला तीन रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अजनी येथे त्यांचा १४ जुलै रोजी मृत्यू झाला.