अमरावती : एकाच परिवारातील चौघांचा बळी घेणाऱ्या बिल्दोरी नाल्यावरील पुलाच्या कामाची निविदा गुरूवारी ‘अपलोड’ करण्यात आली. यासाठी गुरूवारी सकाळी सहा कोटींचा निधी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून दिला. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी नवीन पुलाची निविदा प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण करा, असे आदेश सिंचन विभागाला दिले होते. आयुक्तांनी हा शब्द पाळला आहे. ५ व ६ आॅगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे तिवसा तालुक्यामधील कौंडण्यपूर जवळील बिल्दोरी या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. नाल्यावरील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ६ आॅगस्टला लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघालेले यवतमाळ येथील आजनकर परिवारातील चारजण कारसह पुराच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा करूण अंत झाला. प्रशासनाला आली जागअमरावती : बिल्दोरी नाल्याच्या ज्या पुलावरून कार पाण्यात कोसळली नि बुडाली तो पूल नेहमीच पाण्याखाली असतो. येथे नवीन पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी दुर्गवाडा, आलवाडा व धारवाडा येथील ग्रामस्थांनी पाच दिवस पाण्यात उभे राहून आंदोलन केले होते. परंतु त्याला आजतागायत मूर्तरुप येऊ शकले नव्हते. ‘लोकमत’ने गावकऱ्यांचा आक्रोश चार व्यक्तींच्या बलिदानाची वेदना लोकदरबारात पोटतिडकीने मांडल्या होत्या. या पुलाच्या मागणीची विभागीय आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली व एका आठवड्याच्या आत या पुलाच्या बांधकामाची निविदा काढा, असे आदेश मुख्य अभियंता सी. व्ही. तुंगे यांना दिले होते. तत्पूर्वी २ आॅगस्ट रोजी त्यांनी पुलाची पाहणी केली. ४ आॅगस्ट रोजी अमरावती येथे वित्त खात्याचे अपर सचिव सुधीर श्रीवास्तव, जलसंपदाचे प्रधान सचिव सतीश गवई, विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक शुक्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या पुलासाठी निधी देणे का आवश्यक आहे हे उपस्थितांना पटवून दिले. या बिल्दोरी पुलाची निविदा प्रक्रिया मार्गी लागली असून वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)
बिल्दोरी पुलाची निविदा मार्गी, सहा कोटींचा निधी उपलब्ध
By admin | Published: August 21, 2015 12:36 AM