कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी १० रुपयांवरून तिकीट थेट ५० रुपये केले होते. आता प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा दहा रुपये दर करण्यात आल्याने प्रवाशांसोबत रेल्वे स्थानकावर येणाऱ्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर गर्दी वाढू नये व त्यापासून संसर्ग पसरू नये, या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले होते. महागड्या तिकीटमुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी झाल्याचे चित्र होते. तसेही कोरोनामुळे अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांवर थांबा घेणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्यांची संख्यादेखील घटविण्यात आली होती. पर्यायाने व कोरोनाच्या भीतीपोटी लोकांनी प्रवास करणे थांबविले होते. दुसऱ्या लाटेनंतर १ जूनपासून संसर्गातून बऱ्यापैकी दिलासा मिळाल्याने अनलॉकची प्रक्रिया राबविणे सुरू झाले. रेल्वे प्रवासी गाड्यादेखील वाढल्या. परिणामी प्रवाशांची संख्यासुद्धा वाढली. अशातच रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये केले. परिणामी प्लॅटफॉर्म तिकीटच्या विक्रीत वाढ झाली आहे.
--–----------------
बॉक्स:
प्लॅटफॉर्म तिकिटाच्या उत्पन्नावर परिणाम
लॉकडाऊनमुळे बऱ्याच प्रवासी गाड्या बंदच होत्या. पहिल्या व दुसऱ्या लाटेने जवळपास सव्वा वर्षांचा कालावधी घेतला. प्रवाशांची संख्यादेखील जेमतेम होती. केवळ प्रवास करणाराच रेल्वेस्थानकावर जात होता. प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये केल्याने उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला. कोरोनाच्या आधी प्लॉटफॉर्म तिकीटच्या माध्यमातून रेल्वेला मोठे उत्पन्न मिळत असे. बडनेरा रेल्वे स्थानकावर त्याची दर दिवसाला मोठी विक्री होत असे.
--------------------
बॉक्स:
प्रवासी वाढले, काही गाड्यांवर गर्दी
कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासन प्रशासनाकडून बऱ्याच बाबतीत सूट दिली जात आहे. रेल्वे गाड्यांची संख्यादेखील वाढली आहे. कामानिमित्त प्रवासी आता रेल्वे गाड्यांमधून प्रवास करीत आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरून विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस यांसह काही लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी वाढल्याचे चित्र आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर अलीकडे प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे. प्रामुख्याने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवर अधिक गर्दी आहे.
-----------------
प्रतिक्रिया -
कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये केले होते. ते आता पुन्हा १० रुपये करण्यात आले. १२ जूनपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- पी.के. सिन्हा, स्टेशन मास्तर, बडनेरा.
-------------------------
पॉइंटर्स
* रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - २५ हजार
* दररोज धावणाऱ्या गाड्या - ६२
-----------------------------
* अमरावती -बडनेरा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीटमधून होणारी कमाई-
1) २०१८-१९ मध्ये दरमहा ३० हजार तिकीट विक्री
2) २०१९-२० मध्ये कोरोनाकाळात मोठी घट
3)२०२१ मध्ये दरमहा दोन हजार तिकीट
-------------------------