प्रदीप भाकरे
अमरावती : महापालिकेच्या लेखा विभागाकडे जमा असलेल्या स्वच्छता कंत्राटदारांच्या सुमारे १२ कोटींच्या एसडीला (सुरक्षा ठेव) पाय फुटले आहेत. डिसेंबर महिन्यात कंत्राट संपुष्टात आल्यानंतर ती एसडीची रक्कम महापालिकेला स्वच्छता कंत्राटदारांना परत करावयाची आहे. मात्र महापालिकेच्या कुठल्याच खात्यात ती रक्कम जमा नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
कंत्राटदारांच्या देयकातून कपात केलेली ती रक्कम महापालिकेने परस्परच अन्यत्र खर्च केली आहे. तत्कालीन आयुक्तांच्या काळातील पहिला आर्थिक घोटाळा म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
महापालिका प्रशासनाने त्या घोटाळ्याला दुजोरा दिला आहे. सन २०१८/१९ मध्ये शहरातील दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय २३ कंत्राटदार नेमण्यात आले. गेली चार, सव्वाचार वर्ष त्या २३ कंत्राटदारांच्या सुमारे ९ लाख रुपये प्रतिकंत्राट मासिक देयकातून १० टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून कपात करण्यात आली. ती रक्कम लेखा विभागाने स्वतंत्र अशा खात्यात ठेवली. ती ११ ते १२ कोटींची रक्कम त्या कंत्राटदारांना जानेवारी २०२४ मध्ये परत करायची आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी लेखा विभागाला त्याबाबत विचारले असता, त्यांची सुरक्षा ठेव अन्यत्र खर्च केल्याने त्यांच्या खात्यात एक पैसाही शिल्लक नसल्याची बाब उघड झाली.
घोटाळा उघड झाल्यानंतर मात्र आता प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. प्रत्यक्षात त्यातील काही रक्कम प्रशासनाने स्वच्छता कंत्राटदारांनाच दिली. मात्र प्रशासनाने १५ व्या वित्त आयोगाचा निधी आल्यानंतर ती रक्कम एसडीच्या खात्यात वळती करायची होती. मात्र, तसे न करता लेखा विभागाने कंत्राटदारांची संपूर्ण सुरक्षा ठेव अन्य कंत्राटदारांवर खर्च केल्याचा आरोप स्वच्छता कंत्राटदारांनी केला आहे. याबाबत अमरावती मनपा साफसफाई कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष संजय माहुरकर, विजय गंगण, सुनील वरठे आदींनी शुक्रवारी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन सुरक्षा ठेवीची चौकशी करण्याची आग्रही मागणी केली.
काम सुरू असताना एसडी परतविल्याचा आरोप
स्वच्छता कंत्राटदारांची एसडी गायब आहे. मात्र काही मोजक्या लोकांना, कंत्राटदारांना ती आधीच अर्थात काम सुरू असताना परत देण्यात आल्याची धक्कादायक आरोप यानिमित्ताने केला जात आहे. कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर एसडीची रक्कम संबंधितांना परत केली जाते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी काहींसाठी तो नियम शिथिल केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
महापालिकेकडे आमची १२ ते १४ कोटी रुपये सुरक्षा ठेव शिल्लक आहे. आमची ती रक्कम महापालिकेने अन्यत्र खर्च केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आम्ही त्या आर्थिक अनियमिततेची विभागीय आयुक्तांकडे चौकशी मागितली आहे.
संजय माहूरकर, अध्यक्ष, साफसफाई कंत्राटदार असोसिएशन
हेमंत ठाकरे मुख्य लेखाधिकारी असताना स्वच्छता कंत्राटदारांच्या महापालिकेकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतून त्यांचीच देयके देण्यात आली होती. त्यांनी त्यासाठी होकार भरला होता. मात्र त्यानंतर आलेला निधी त्यात वळती करण्यात आला नसावा.
प्रवीण इंगोले, मुख्य लेखाधिकारी