फोटो - धारणी १३ पी
धारणी : मेळघाटातील दुर्गम भागात आरोग्य सेवा बळकट करण्याच्या उद्देशातून, जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागामार्फत नवीन मोठी रुग्णवाहिका धारणी तालुक्यातील बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झाली. आरोग्य केंद्राशी संलग्न २५ आदिवासी गावांतील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकार्पण करताना मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सीमा घाडगे, धारणी पंचायत समितीचे उपसभापती जगदीश हेकडे, बिजुधावडीच्या सरपंच गुलबीबाई जांबेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश अंभोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री नवलाखे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश घाडगे, बिहारी जांबेकर, रूपेश भारती यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व इतर आरोग्य कर्मचारी व अधिकारी हजर होते.
गरोदर माता, शून्य ते एक वर्ष वयोगटातील बालके, अपघातग्रस्त रुग्ण व इतर अतिआवश्यक रुग्णांकरिता ही रुग्णवाहिका वापरण्यात येईल व सदर रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांना वेळेत संदर्भसेवा देण्यास सोपे होईल, असे डॉ. दिनेश अंभोरे यांनी माहिती दिली. आमदार राजकुमार पटेल यांनी रुग्णवाहिकेचे पूजन करून वाहनचालक पंकज वाघमारे यांना तिलक लावून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने कार्यक्षेत्रातील नागरिक आनंदी असून सर्वांनी जिल्हा आरोग्य विभागाचे आभार मानले .