लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील दुर्गम, अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना जलदगतीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. मात्र, आजमितीला या बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. तथापि, बाईक अॅम्ब्युलन्स सेवेच्या मोबदल्यात शासन तिजोरीतून कंपनीला शुल्क अदा केले जात आहे.शासनाच्या आरोग्यसेवा विभागाने छत्तीसगडच्या धर्तीवर मेळघाटात बाईक अॅम्ब्युलन्स सेवेला प्रारंभ डिसेंबर २०१८ मध्ये प्रारंभ केला. नागपूर हिवाळी अधिवेशन काळात या उपक्रमाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. टेंभु्रसोंडा, काटकुंभ, बैरागड व हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासींच्या आरोग्य सेवेकरिता बाईक अॅम्ब्युलन्स ठेवण्यात आल्यात. परंतु, हल्ली या अॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत. दुर्गंम, अतिदुर्गम भागातून किती आदिवासी रूग्णांची ने-आण बाईक अॅम्ब्युलन्सने करण्यात आली, याची आकडेवारी जिल्हा परिषद आरोग्य विभाग अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपलब्ध नाही. त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू झालेली ही सेवा केवळ शासन निधी लाटण्यासाठी तर नाही ना, असा सूर उमटला आहे. पुणे येथील बीव्हीजी कंपनीकडून बाईक अॅम्ब्युलन्स आरोग्य सेवेचा करार करण्यात आला. मात्र, या सेवेसाठी ना डॉक्टर, ना वाहने अशी दयनीय अवस्था मेळघाटातील आरोग्य सेवेची आहे. या सेवेकरिता १२ ते १५ हजार रूपयांच्या मानधनावर कंपनीकडे डॉक्टर नेमले. मात्र, मेळघाटात तोकड्या मानधनावर डॉक्टरांना परवडत नसल्याने तेदेखील सोडून गेल्याची माहिती आहे. मध्यंतरी आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली. परंतु, त्यांच्या निवासाची व्यवस्था बीव्हीजी कंपनीकडून झाली नाही. त्यामुळे आरोग्य सेवकांनीसुद्धा मेळघाटातून पळ काढला आहे. परिणामी बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात पडल्याची माहिती आहे.पुणे येथून नियंत्रणमेळघाटातील आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या बाईक अॅम्ब्युलन्सवर नियंत्रण पुणे येथून चालते. आरोग्य सेवेकरिता बाईक अॅम्ब्युलन्सची गरज पडल्यास कॉल सेंटरवर संपर्क करावा लागतो. त्यानंतर पुणे येथून सदर बाईक अॅम्ब्युलन्स चालकाला गाव, स्थळ कळविले जाते. मात्र, काही महिन्यांपासून ही वाहने धूळखात पडली आहे. चालक नाही, डॉक्टर नाही. त्यामुळे ही सेवा मेळघाटात कशी राबविणार, असा सवाल आदिवासींचा आहे.मेळघाटात पाच बाईक अॅम्ब्युलन्स आहेत. मध्यंतरी या सेवेकरिता मनुष्यबळाचा अभाव होता. बीव्हीजी कंपनीला ही बाब कळविली आहे. बाईक अॅम्ब्युलन्स आरोग्य सेवेची काय स्थिती आहे, याबाबत अहवाल मागविला जाईल.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.
मेळघाटात बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:45 AM
मेळघाटातील दुर्गम, अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना जलदगतीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. मात्र, आजमितीला या बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत.
ठळक मुद्देआरोग्य सेवेचा बोजवारा : प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी अनभिज्ञ