अमरावती: रस्त्याने पायदळ जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या इसमाची दुचाकी स्लिप झाल्याने तो कोसळला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला. किरणनगरस्थित दि विदर्भ प्रिमियर को. ऑप. हाउसिंग सोसायटी वॉल कम्पाउंडच्या बाजुच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जितेंन्द्र माणीकराव जावरे, (रा. छांगाणीनगर, रविनगर, अमरावती) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरूध्द फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहेे.
किरणनगरमधील प्रणिता नामक ४७ वर्षीय गृहिणी या शुक्रवारी सकाळी मंगलधाम परिसरातील एका लग्नसोहळ्यात सहभागी झाल्या. लग्न सोहळा आटोपून त्या शेजारी महिलांसोबत दुपारी दोनच्या सुमारास मंगलधाम परिसरातील एक्सप्रेस हायवे रोडने पायी किरणनगरकडे निघाल्या. दुपारी २.३० च्या सुमारास त्या किरणनगर येथील दि विदर्भ प्रिमियर को. ऑप. हाउसिंग सोसायटीलगतच्या रस्त्यावर असताना समोरून एक दुचाकीस्वार आला. त्याने प्रणिता यांच्या सुमारे ५५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. त्यामुळे प्रणिता व त्यांच्यासोबत असलेल्या सर्वजणी ओरडल्या.
पाठलागामुळे तो सैरावळ
तेवढ्यात मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने मदतीचा हात पुढे करत प्रणिता यांना दुचाकीवर बसविले. त्या निर्मल नामक मुलासह प्रणिता यांनी मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वााराचा पाठलाग केला. तो इसम दस्तुरनगर बायपास रोडवरील शिवानंद हाईट्स अपार्टमेन्ट दस्तुरनगरच्या बाजुला शिरला. मात्र, तेथे त्याची दुचाकी स्लिप झाल्याने तो दुचाकीसह कोसळला. तेवढयात पोहोचलेल्या फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला पकडले. पडल्यामुळे तो जखमी देखील झाला. दरम्यान त्याने स्वत:चे नाव जितेंन्द्र जावरे असे सांगीतले. त्याच्याकडून एमएच २८ एडी ७३४७ ही दुचाकी देखील जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीकडून मंगळसूत्र हस्तगत झालेले नाही. पळत असताना ते त्याने सहकाऱ्याकडे दिले असावे, वा फेकले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
आरोपी चेनस्नॅचरला ‘ऑन द स्पॉट’ पकडण्यात आले. आरोपीकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. अटकेनंतर मंगळसूत्र रिकव्हर करण्यात येईल.- नितीन मगर, पोलीस निरिक्षक, फ्रेजरपुरा