अमरावती : ग्रामीण भागात दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी अवघ्या तीन तासाच्या कालावधीत दुचाकी चोरीच्या तीन घटनांची नोंद करण्यात आली. ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात दररोज सरासरी दुचाकी चोरीच्या दोन घटनांची नोंद केली जाते.
दर्यापूर शहरातील अकोला मार्गावरील सूतगिरणीजवळून एमएच २७ बीवाय ३९५९ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. काकाकडून चालविण्यास आणलेली ती दुचाकी शेख जमीर शेख अमीर (२७, रा. हिरापुरा, अचलपूर) यांनी २० सप्टेंबर रोजी दुपारी सूतगिरणीजवळ ठेवली होती. थोड्यावेळाने ती अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी २३ सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तर, मोर्शी येथील टॉवर परिसरातून एमएच २७ बीके १७६३ या क्रमांकाची दुचाकी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास लंपास करण्यात आली. याप्रकरणी दुचाकीमालक अ. जमीर अ. जमील यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४८ वाजता अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. दुचाकी चोरीची अन्य एक घटना वरूड तालुक्यातील अमडापूर शिवारात घडली. प्रवीण दापूरकर (३०, रा. अमडापूर) हे एमएच २७ एएच ४९१४ ही दुचाकी घेऊन शेतात गेले. ती मांगरुळी रोडवर ठेवून ते शेतात गेले. कामे करून परत आल्यानंतर त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी मित्र, व शेजारील शेतकऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, ती आढळून न आल्याने त्यांनी २३ सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञाताविरूद्ध तक्रार नोंदविली. वरूड पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
//////
बॉक्स
चोर पसारच,
यंदाच्या आठ महिन्यात चोरांनी ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चांदूरबाजार, वरूड व मोर्शी तालुक्यात चोरांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. विशेष म्हणजे एकाच पद्धतीने होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र सुरू असताना एकही चोरटा पोलिसांना सापडलेला नाही, त्याचबरोबर एकही चोरी उघडकीस आली नसल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार पाच महिन्यांपूर्वी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी एका टोळीकडून चोरीच्या ५० च्या वर दुचाकी जप्त केल्या होत्या. मात्र, त्यानंतर दुचाकी चोर पोलिसांना गवसलेले नाहीत.