अमरावती : सहा लाख रुपयांच्या स्पोर्ट्स बाइकने शहरात ‘स्टंट रायडिंग’ करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध फौजदारी व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा ‘बुलेटराजा’ वर्षभरापासून शहर पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलीस आयुक्त कार्यालय व दोन्ही उड्डाणपुलांवरून तो ती सहा लाखांची बाईक घेऊन ‘मला पकडून दाखवाच,’ असे आव्हानच जणू काही देत होता.
अखेर २५ डिसेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास कोर्ट चौकात त्याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९ व मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक विभागाच्या पूर्व शाखेचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वातील वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. अभिजित (३१, रा. गणेशनगर) असे त्या बाईकस्वाराचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी एमएच ०३ सीक्यू ०३३३ ही स्पोर्ट्स बाइक बेदरकारपणे व स्टंट रायडिंग करताना त्याला इर्विनस्थित वाहतूक शाखेजवळ थांबविण्यात आले. मात्र, पोलिसांना न जुमानता तो तेथून सुसाट वेगाने पळून गेला. त्यामुळे पुढील पॉईंटला कळविण्यात आले. त्याला कोर्ट चाैकात थांबविण्यात आले. त्याच्या बाईकची पाहणी केली असता ती तब्बल ६०० सीसीची असल्याचे आढळून आले. त्या बाईकची किंमत ५ ते ६ लाख रुपयांच्या घरात असल्याचे देखील आढळून आले. त्याच्याविरुद्ध भरधाव वेगाने वाहन चालवून धडक मारून अपघात केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक उदयशंकर तिवारी यांच्या तक्रारीवरून २६ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून बेदरकार
तब्बल ६०० सीसीची बाइक घेऊन पोलीस आयुक्त कार्यालय, नवीन बायपास, शहरातील दोन्ही उड्डाणपुलांवरून तो अगदी बेदरकारपणे वाहन हाकत होता. इंजिनचा प्रचंड मोठा आवाज करत पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून जाणे, हा त्याच्या सवयीचा भाग बनला होता. त्यामुळे तो शहर व वाहतूक पोलिसांच्या रडारवर होता. अखेर शनिवारी त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारण्यात आला.
स्टंटबाजी करणाऱ्या एमएच २७ एवाय ६२९२ व एमएच ०३ सीक्यू ०३३३ या दुचाकीच्या चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यातील अभिजित नामक वाहनचालक स्टंटबाजी करताना आढळून आला.
बाबाराव अवचार, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा