लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : तीन महिन्यांपासून भाववाढ न झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस विक्रीविना घरात पडून आहे. परिणामी, अंगाला खाज सुटत असल्याने कुटुंबातील सदस्य कापूस विकण्यासाठी कुटुंबप्रमुखाकडे तगादा लावत आहे.विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला हा कापूस पट्टा म्हणून ओळखला जातो. ‘पांढरे सोने’ म्हणून परिचित असलेल्या या पिकाला जिल्ह्यात ‘कॅश क्रॉप’ संबोधले जाते. कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांच्या किमतीत व मजुरीत भरमसाठ वाढ झाल्याने कापसाला मिळणारा सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दरदेखील परवडणारा नाही. एकदम रोखीने पैसे येत असल्याने संपूर्ण कापूस एकाच वेळी विकण्यासाठी शेतकरी उत्सुक असतात. गतवर्षी कापसाचे दर ५१०० ते ५३०० प्रतिक्विंटल असे होते. यावर्षी गेल्या तीन महिन्यांपासून कापूस ५९०० ते सहा हजारांवर स्थिर आहेत. मार्च उलटूनही भाव वाढले नाही. कापूस निघून आता सहा महिने झाले. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे व कापसातील मॉइश्चर कमी होऊन भारमान घटत आहे. त्यातच कापसाची गंजी लावून जास्त दिवस झाल्याने कुटुंबातील सदस्यांना खाजेची लागण झाली आहे. त्यामुळे दर लवकर वाढावेत व कापसाची विक्री व्हावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
कापूस हंगाम अंतिम टप्प्यातहजारो क्विंटल कापूस घरात पडून असल्याने व भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनपेक्षाही कापसाला पसंती दिली होती. कापसाचे उत्पादन बोंडअळीमुळे घटले. मात्र, जो उणापुरा कापूस निघाला, तोदेखील चांगल्या दराअभावी घरात पडून आहे.
कापसातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आम्हीघरकाम, लग्न आदी कापसाच्या भरवशावर असते. मार्च संपला की, एप्रिल महिन्यात साधारणपणे भाव वाढ होत असते. मात्र, यंदा कापसाची दरवाढ अद्याप झालेली नाही.- भानुदान भोंडे, शेतकरी, राजुरा बाजार
कापसाचे भाव हे मुख्यत: सरकी व रुईवर अवलंबून असतात. विदेशात कापसाला मागणी असल्यावर ‘मागणी व पुरवठा’ हा अर्थशास्त्राचा नियम लागू होतो. त्यावर बरेच काही ठरत असते. याकडे आमचेही लक्ष आहे. - राजेश गांधी, व्यावसायिक