लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : खोटी कागदपत्रे जोडून घरभाडे भत्याची उचल करून शासनाची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या जिल्हाधिकारी व अन्य ३६८ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चांदूर बाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. यासंबंधाने ठाणेदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह ज्या कर्मचाऱ्यांचा थेट जनतेशी संबंध येतो, अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाकडून बंधनकारक केले आहे. यात ग्रामसेवकांचा समावेश आहे. घरभाडे भत्त्याची उचल करण्याकरिता शासनाच्या ९ सप्टेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार ग्रामसभेचा ठराव असणे बंधनकारक आहे. असे न केल्यास त्यांना घरभाडे भत्ता देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, कृषिसेवक व आरोग्यसेवक मुख्यालयी राहत नसल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे. तालुक्यात ४० ग्रामसेवक कार्यरत आहेत. या ग्रामसेवकांपैकी ११ ग्रामसेवकांनी घरभाड्याच्या बनावट पावत्या लावून, घरभाडे भत्ता वसूल केला. उर्वरित २९ ग्रामसेवकांनी कोणत्याही प्रकारचा लेखी पुरावा न घेता स्थानिक गटविकास अधिकाऱ्यांकडून घरभाडे भत्ता अदा करण्यात आला. तक्रारीवर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याने चांदूर बाजार पोलिसांत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, चांदूर बाजार तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसह तालुक्यातील २८९ जिल्हा परिषद शिक्षक, ४२ ग्रामसेवक व ३७ तलाठ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जाणार असल्याची माहिती लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव व त्यांचे वकील मनीष मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली.चांदूरबाजार तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच ही लालफितशाही शिरली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, संबंधितांवर दंड उगारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामसेवकांनी जोडल्या बनावट पावत्याचांदूर बाजार तालुक्यातील ग्रामसेवकांना महिन्याकाठी १ लाख २५ हजार रुपये घरभाडे भत्ता मिळतो. त्यातील ११ ग्रामसेवकांनी घरभाडे भत्ता उचल करण्याकरिता ज्या घरमालकांच्या पावत्या लावल्या, त्या सर्व बनावट असून, ग्रामसेवकांनी स्वत: तयार केल्या आहेत. त्यावर असलेल्या घरमालकांची स्वाक्षरीसुद्धा बनावट आहे. यामुळे शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या अपहार व फसवणुकीत सदर कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी यांचे संगनमत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे.
गोपाल भालेराव यांची तक्रार प्राप्त झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तक्रारातील रक्कम अधिक व प्रकरण आर्थिक फसवणुकीसंदर्भात असल्याने पुढील चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ. - सुनील किनगे, ठाणेदार, चांदूर बाजार