धीरेंद्र चाकोलकर
फोटो - संगावार ०२ एस
अमरावती : पॉलिइथिलिन अर्थात भाज्या व किरकोळ साहित्यासाठी पुढे केली जाणारी प्लास्टिकची पातळ थैली नष्ट होत नसल्याने पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर शहरातील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापक विजया संगावार यांनी उपाय शोधला आहे. त्याद्वारे १८० दिवसांत पॉलिइथिलिनच्या कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. या संशोधनाचे पेटेंट भारत सरकारकडून त्यांना बहाल करण्यात आले आहे.
पॉलिइथिलिन कॅरीबॅगचे डीग्रेडेशन हा जगाच्या पाठीवर संशोधनक्षेत्रात ज्वलंत विषय आहे. या कॅरीबॅग नष्ट करण्याची किंवा त्यांची विल्हेवाट लावण्याची शास्त्रीय पध्दत उपलब्ध नसल्याने त्या मानवासाठीच नव्हे, तर संपूर्ण विश्वासाठी अभिशाप बनल्या आहेत. २०११ मध्ये मुंबईत जो महापूर आला, त्यात प्रचंड प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली होती. त्यात कॅरीबॅगने पाणी अडवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका अदा केली होती. त्यानंतर विजया संगावार त्यांचे संशोधन विद्यार्थी प्राध्यापक अमित गड़े व गणेश येरावार यांच्यासमवेत या विषयात संशोधनास सुरवात केली. लो डेन्सिटी पॉलिइथिलिनमध्ये पॉलिइथिलिन ग्लायकॉल मिसळून त्यांच्या पातळ फिल्म तयार करून त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने चाचण्या घेतल्या. ठरावीक प्रमाणात घेतलेल्या या मिश्रणाच्या फिल्मला साधारणपणे १८० दिवसांत तडे गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.पॉलिइथिलिन बायइरोडेबल-डीग्रेडेबल करण्याचे संशोधन यशस्वी ठरल्यानंतर २०१५ मध्ये पेटेंटसाठी अर्ज सादर करण्यात आला. जगभरातून अहवाल मिळविल्यानंतर १९ नोव्हेंबर २०२० रोजी केंद्र शासनाने पेटेंट मान्य केले.
संगावार यांचे दुसरे पेटेंट
विजया संगावार यांचे हे दुसरे पेटेटं असून, पहिले पेटेंट भारत सरकारकडून २०१८ साली प्रदान झालेले आहे. पॉलिमर नॅनोकम्पोझिट्स, पॉलिमरथिन फिल्म्स, बायोडीग्रेडेबल पॉलिमर, पॉलिमर नॅनोपार्टिकल्स फॉर मेडिकल अप्लायन्सेस, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट हे त्यांचे उपयुक्त संशोधनाचे विषय आहेत. आतापर्यंत एकण १३ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली. त्यांच्या संशोधनकार्याचे वाचन चुसान (दक्षिण कोरिया) व सिएटल (अमेरिका) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये झाले असून, दोन्ही देशांनी त्यांना सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाचा पुरस्काराने सन्मानित केले.
-------------
पॉलिइथिलिन कॅरीबॅगचे किमान एक हजार वर्षे विघटन होत नाही. आम्ही केलेल्या संशोधनाचे परिणाम मात्र १८० दिवसांत दिसून आले. ही पद्धत वापरून पॉलिथिन बॅग नष्ट झाल्यास पर्यावरणाला हातभार लागेल.
- विजया संगावार, प्राध्यापक, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था